तीन राज्यांच्या सिमेवर ‘सुपर वॉच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 12:49 IST2019-04-28T12:49:03+5:302019-04-28T12:49:49+5:30
२४ तास दक्षता : निवडणुकीत गैरप्रकार होऊ नयेत म्हणून प्रशासनातील अधिकारी सजग

तीन राज्यांच्या सिमेवर ‘सुपर वॉच’
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गुजरातच्या सिमेलगतची ३१ व मध्यप्रदेशच्या सिमेलगतच्या १२ गावांकडे जिल्हा प्रशासनाने विशेष नजर ठेवली आहे. जिल्ह्यातील काही गावांना जाण्यासाठी गुजरातची सिमा वेळोवेळी ओलांडावी लागत असते. ही बाब लक्षात घेता सिमावर्ती भागात खास चेकपोस्ट तयार करण्यात आली असून गस्ती वाहने तैणात करण्यात आली आहेत. मतदार संघातील गावांनाच जाण्यासाठी दुसऱ्या राज्याची सिमा वारंवार ओलांडावी लागणार असलेला नंदुरबार हा राज्यातील एकमेव लोकसभा मतदारसंघ आहे हे विशेष.
नंदुरबार हा गुजरात व मध्यप्रदेश राज्यांच्या सिमेवर वसलेला जिल्हा आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्टÑ निर्मितीच्या वेळी तापी पट्टयातील गुजरातची अनेक गावे थेट २० ते २५ किलोमिटर आत घुसली. त्यामुळे या गावांना जाण्यासाठी किंवा या गावांच्या पुढे असलेल्या जिल्ह्यातील गावांना जाण्यासाठी दोन्ही राज्यांच्या सिमा वारंवार ओलांडव्या लागतात. या भौगोलिक परिस्थितीमुळे सिमेलगतच्या दोन्ही राज्यातील गावांमधील लोकांमध्ये सांस्कृतिक व सामाजिकदृष्टया वेगळेच नाते निर्माण झाले आहे. या बाबीचा फायदा मात्र, अवैध धंदेवाले व गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकंही घेत असतात. एका राज्यात गुन्हा करून लागलीच दुसºया राज्यात जाण्यासाठी ते सोयीचे ठरते. शिवाय अवैध मद्य वाहतुकीसाठीही हा भाग संबधितांना मोठा सोयीचा ठरत आहे.
मध्यप्रदेशलगतच्या शहादा तालुक्यातील अनेक गावांमध्ये देखील ही समस्या कायम आहे. या भागात तर अवैध मद्य निर्मितीचे कारखानेच अनेकवेळा उध्वस्त करण्यात आलेले आहे. ही बाब लक्षात घेता निवडणुकीच्या काळात विशेष दक्षता घ्यावी लागत आहे.
सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर तिन्ही राज्यांमधील लगतच्या जिल्ह्यामधील प्रमुख अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत यावर मोठा खल करण्यात आला. निवडणुकीत गुंड आणि असामाजिक तत्वांचा उपद्रव होऊ नये यासाठी विशेष दक्षता घेण्यात येत आहे. त्यासाठी १६ ठिकाणी चेकपोस्ट तयार करण्यात आले आहेत. पोलिसांची गस्ती वाहने देखील नजर ठेवून आहेत. नंदुरबारसह गुजरातचा तापी, डांग, नर्मदा जिल्हा आणि मध्यप्रदेशचा बडवानी जिल्ह्यातील पोलिसांनी संयुक्तरित्या समायोजन केले आहे. त्यातून माहितीची देवानघेवान देखील होत आहे. २९ रोजी मतदान होत आहे. त्यामुळे नंदुरबार पोलिसांनी विशेष काळजी घेतली आहे.