पुस्तके परत करण्याबाबत पालकांसह विद्यार्थ्यांची उदासीनता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:30 IST2021-05-10T04:30:54+5:302021-05-10T04:30:54+5:30
नंदुरबार : पर्यावरणाच्या दृष्टीने तसेच खर्च वाचवण्याच्या दृष्टीने पाहिले तर आठवीच्या विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणाऱ्या पुस्तकांची छपाई यंदा कमी ...

पुस्तके परत करण्याबाबत पालकांसह विद्यार्थ्यांची उदासीनता
नंदुरबार : पर्यावरणाच्या दृष्टीने तसेच खर्च वाचवण्याच्या दृष्टीने पाहिले तर आठवीच्या विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणाऱ्या पुस्तकांची छपाई यंदा कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे गेल्या शैक्षणिक वर्षात सुस्थितीत असलेली पुस्तके विद्यार्थ्यांकडून परत घेण्यात येणार आहेत. परंतु, शाळा बंद असल्यामुळे पुस्तके कसेे परत घेणार, असा प्रश्न आहे. दरम्यान, यंदा दोन ते तीन टक्क्यांनी कमी पुस्तक नोंदणी केली जाणार असल्याची शक्यता आहे.
शासकीय व अनुदानित शाळेतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्यात येतात. त्यासाठी दरवर्षी मे महिन्यात पुस्तकांची मागणी पाठ्यपुस्तक मंडळाकडे नोंदणी केली जाते. गेल्या वर्षी शाळा सुरू झाल्या नाहीत, तरीही जून व जुलै महिन्यातच विद्यार्थ्यांना घरपोच पुस्तके पुरविण्यात आली होती. ती पुस्तके सुस्थितीत असतील, असे गृहीत धरून यंदा सुस्थितीतील पुस्तके पुनर्वापर करण्याचा निर्णय पाठ्यपुस्तक मंडळाने घेतला आहे. त्यानुसार, पुस्तकांची मागणी करण्याच्या सूचना शिक्षण विभागाला देण्यात आल्या आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून पुस्तके परत घेतले जाणार आहेत.
दरवर्षी निकाल लागण्याच्या दिवशी किंवा शाळेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांकडून पुस्तके परत घेतली जातात. यंदा मात्र शाळा बंद होत्या. निकालही लागला नाही. परिणामी, पुस्तके शाळांमध्ये परत आली नाहीत. शिक्षकांनी घरोघरी जाऊन जसे पुस्तकवाटप केले तसेच पुस्तके परतही घेण्याचे ठरविले तरी सध्या कोरोनाकाळ असल्याने ते किती शक्य आहे, हा प्रश्न आहे.
त्यामुळे पर्यावरण वाचविण्यासाठी तसेच पुस्तक छपाईचा खर्च कमी करण्यासाठी पालकांनीच पुढाकार घेऊन सुस्थितीतील पुस्तके शाळांमध्ये जमा करणे आवश्यक आहे.