ग्रामीण भागात बससेवा सुरू करण्याची विद्यार्थ्यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:35 IST2021-08-25T04:35:36+5:302021-08-25T04:35:36+5:30
सध्या नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण नसल्याने शिक्षण विभागाने आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने शहरी व ग्रामीण ...

ग्रामीण भागात बससेवा सुरू करण्याची विद्यार्थ्यांची मागणी
सध्या नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण नसल्याने शिक्षण विभागाने आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने शहरी व ग्रामीण भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. सध्या दहावी व बारावीचे निकाल लागल्याने पालक व विद्यार्थी विविध डिप्लोमा व इतर शैक्षणिक कागदपत्रांसाठी जिल्ह्याच्या व तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करीत आहेत. मात्र त्यांना ये-जा करण्यासाठी वेळेवर बस नसल्याने अतोनात हाल होत आहेत. विद्यार्थी व पालकांना खासगी वाहनाचा वापर करावा लागत असल्यामुळे आर्थिक व वेळेचा अपव्यय होत आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, सामान्य माणसांना, शेतकऱ्यांना कामासाठी व व्यवहारासाठी जाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. खासगी वाहनचालक अव्वाच्या सव्वा भाडे आकारणी करीत असतात व पूर्ण वाहन प्रवासी भरल्याशिवाय निघत नाही. ग्रामीण भागातील मार्गावर प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असते. राणीपूर, लक्कडकोट, नागझिरी, अंबापूर, गणोर, टवळाई, आमोदा, फत्तेपूर, कुसुमवाडा, नावागाव, कन्साई, भुतेआकसपूर, कुढावद आदी गावांतील विद्यार्थ्यांना म्हसावद, लोणखेडा व तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी जाण्यासाठी बस नाही. परिणामी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहात आहेत. ग्रामीण भागात एसटी बसेस सुरू कराव्यात, अशी मागणी पालक व विद्यार्थी करीत आहेत.