बामखेडा महाविद्यालयाचे विद्यार्थी जनजागृतीसाठी शेतशिवारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:24 IST2021-05-03T04:24:40+5:302021-05-03T04:24:40+5:30
या जनजागृती अंतर्गत मास्कचा वापर, त्याचे महत्त्व, फायदे, पद्धती, हात धुण्याच्या पद्धती, त्याचे महत्त्व , सामाजिक अंतराचे ...

बामखेडा महाविद्यालयाचे विद्यार्थी जनजागृतीसाठी शेतशिवारात
या जनजागृती अंतर्गत मास्कचा वापर, त्याचे महत्त्व, फायदे, पद्धती, हात धुण्याच्या पद्धती, त्याचे महत्त्व , सामाजिक अंतराचे महत्त्व, त्याची गरज तसेच सॅनिटायझरचा वेळोवेळी करावयाचा वापर आणि स्वच्छता या संदर्भात जाणीव जागृती करीत आहेत. विद्यार्थी घरोघर जाऊन कोविड-१९ दक्षता सोबतच लसीकरण याचे महत्त्व लोकांना पटवून देत आहेत. विद्यार्थी व विद्यार्थिनी घरोघरी जाऊन लस घेण्याचे महत्त्व, फायदे, त्यामुळे प्राप्त होणारी सुरक्षितता यासंदर्भात विवेचन करून लोकांच्या मनामधील लस संदर्भातील गैरसमज दूर करीत आहेत. विद्यार्थ्यांच्या या आवाहनामुळे खेड्यातील नागरिक लसीकरणास प्रतिसाद देत आहेत.
काही नागरिक विद्यार्थ्यांच्या या जाणीव जागृती उपक्रमात सहभागी होत आहेत. दरम्यान स्वयंसेवक विद्यार्थिनींनी घरीच मास्क तयार करुन गरजूंना त्याचे वितरण केले. तसेच काही विद्यार्थी लसीकरण केंद्रांवर स्वयंसेवक म्हणून काम करत आहेत. अभनपूर या आदिवासी पाड्यावर सागर भील व त्याच्या पथकातील स्वयंसेवक, जवखेडा येथे मनीष साळुंखे व पथक, तोरखेडा येथे सुजाता घोरपडे व पथक, कोंढावळ येथे जयेश सोनवणे व पथक, जयनगर येथे हर्षदा बावा, रत्ना पारधी, बोराळा येथे माधुरी पाटील तर काकर्दा येथे लक्ष्मण खंडू पाटील आणि त्याचे सहकारी स्वयंसेवक असे कार्यरत आहेत. हे विद्यार्थी विद्यार्थिनी रक्तदान आणि प्लाझ्मा दानाचे महत्त्वही गावकऱ्यांना समजावून सांगत आहेत. या विद्यार्थ्यांचे सध्या शहादा तालुक्यातून काैतुक करण्यात येत आहे. ग्राम विकास संस्थेचे अध्यक्ष जी. आय. पटेल, उपाध्यक्ष पुना पटेल व सचिव बी.व्ही. चौधरी, प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील आणि सर्व प्राध्यापकांनी रासेयेच्या स्वयंसेवकांचे काैतुक केले आहे. विद्यार्थ्यांना रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.सी.एस. करंके यांचे मार्गदर्शन लाभत आहेत.