एसटीची इलेक्ट्रॉनिक तिकीट यंत्रे पडली बंद, पारंपरिक टिकटिक सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:39 IST2021-02-25T04:39:45+5:302021-02-25T04:39:45+5:30
नंदुरबार : धुळे विभागातील जवळपास ६० टक्के इलेक्ट्रॉनिक तिकीट यंत्रे बंद पडल्याने, जुन्याच पद्धतीने अर्थात कागदी तिकीट पंचिंग करून ...

एसटीची इलेक्ट्रॉनिक तिकीट यंत्रे पडली बंद, पारंपरिक टिकटिक सुरू
नंदुरबार : धुळे विभागातील जवळपास ६० टक्के इलेक्ट्रॉनिक तिकीट यंत्रे बंद पडल्याने, जुन्याच पद्धतीने अर्थात कागदी तिकीट पंचिंग करून ते प्रवाशांना दिले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिकीट यंत्रांच्या दुरुस्तीबाबतची उदासीनता आणि संबंधित पुरवठादार कंपनीचा मार्च महिन्यात संपणारा करार याला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.
गेल्या चार वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून एसटी महामंडळाने इलेक्ट्रॅानिक तिकीट इश्यू मशीनच्या अर्थात, ईटीआयच्या साहाय्याने प्रवाशांना तिकीट देण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी काही आगारांतील या यंत्राला इंटरनेटची जोड देऊन जीपीएस सीस्टिमही बसविण्यात आली आहे. यामुळे तिकिटांचा काळा बाजार थांबून वाहकांनाही ते सुटसुटीत झाले होते, परंतु देखभाल व दुरुस्तीअभावी ही यंत्रे अनेक वेळा बंद पडत होती. त्यामुळे कागदी तिकिटाचा ट्रेही वाहकांना जवळ बाळगावा लागत असतो.
आता तर धुळे विभागातील जवळपास ६० टक्के यंत्रे बंद पडली असल्याचे चित्र आहे. नंदुरबार, शहादा, नवापूर, अक्कलकुवा आगारातील यंत्रांचा सर्वाधिक बंद पडण्यामध्ये समावेश आहे. यामुळे या आगारांमधील वाहकांना कागदी तिकिटाचा ट्रे घेऊन नेहमीप्रमाणे टिकटिक करीत पंचिंग करावे लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तिकीट यंत्र नादुरुस्त झाल्यावर, त्याच्या दुरुस्तीबाबत, त्याच्या स्पेअरपार्ट मिळविण्याबाबत उदासीनता आहे, याशिवाय यंत्र पुरविणाऱ्या कंपनीचा करार हा मार्च महिन्यात संपणार आहे. त्यामुळेही दुरुस्तीबाबत फारसे गांभीर्याने घेतले जात नसल्याचे चित्र आहे.