प्लॅस्टिकबंदीला हरताळ; दुकानदारांकडून सर्रास वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:20 IST2021-06-29T04:20:51+5:302021-06-29T04:20:51+5:30
नंदुरबार : राज्य शासनाने प्लॅस्टिक व थर्माकोलच्या वापरावर बंदी घातली आहे. मात्र, शहरात प्लॅस्टिकबंदीला हरताळ फासला जात असून, दुकानदारांकडून ...

प्लॅस्टिकबंदीला हरताळ; दुकानदारांकडून सर्रास वापर
नंदुरबार : राज्य शासनाने प्लॅस्टिक व थर्माकोलच्या वापरावर बंदी घातली आहे. मात्र, शहरात प्लॅस्टिकबंदीला हरताळ फासला जात असून, दुकानदारांकडून प्लॅस्टिकचा सर्रास वापर केला जात आहे. प्रशासकीय यंत्रणा कोरोनाकाळातील उपाययोजना करण्याकडे व्यस्त असल्याने कारवाईकडे दुर्लक्ष होत आहे. प्लॅस्टिक व थर्माकोल अविघटनशील वस्तूंचे उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी व साठवणूक अधिसूचना २३ मार्च २०१८ पासून लागू करण्यात आली आहे. यानुसार नगरपालिकेला कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले. त्यानुसार पालिकेने सुरुवातीला नंदुरबार शहरात धडाकेबाज मोहीम राबवून प्लॅस्टिक वापरणाऱ्या दुकानदारांवर कारवाईचा सपाटा सुरू केला होता. मागीलवर्षीसुद्धा ही मोहीम तीव्र करण्यात आली होती. मात्र, मार्च महिन्यात कोरोनाने कहर केल्याने आरोग्य विभागाचे पथक कोरोनाच्या लढ्यात गुंतले. त्यामुळे कारवाईकडे दुर्लक्ष झाले. आता या पथकाकडून कुणावरही कारवाई होत नसल्याने हे दुकानदार बिनधास्त झाले आहेत. त्यामुळे जागोजागी प्लॅस्टिक पिशव्यांचा खच दिसून येत आहे. त्यामुळे आता पथकाने कारवाई करण्याची गरज आहे.