स्ट्रॅाबेरीच्या गोडव्याने मिळाला ‘निधी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 12:46 IST2021-02-12T12:45:51+5:302021-02-12T12:46:58+5:30

रमाकांत पाटील लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सातपुड्यात उत्तम प्रतिची स्ट्रॉबेरी उत्पादीत होत असून, या स्ट्रॉबेरीचे कौतुक खुद्द उपमुख्यमंत्री ...

Strawberry sweets get 'funding' | स्ट्रॅाबेरीच्या गोडव्याने मिळाला ‘निधी’

स्ट्रॅाबेरीच्या गोडव्याने मिळाला ‘निधी’

रमाकांत पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सातपुड्यात उत्तम प्रतिची स्ट्रॉबेरी उत्पादीत होत असून, या स्ट्रॉबेरीचे कौतुक खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही केले आहे. नव्हे तर स्ट्रॉबेरीची चव चाखतच नंदुरबार जिल्ह्याला विकास आराखड्यासाठी ६० कोटींचा वाढीव निधीही मंजूर केला. तसेच स्ट्रॉबेरीला प्रोत्साहन देण्यासाठी योजना देण्याचेही आश्वासन दिले.
नाशिक येथे बुधवारी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विभागातील नियोजन समित्यांची बैठक घेण्यात आली होती. नंदुरबार जिल्ह्यात सध्या सातपुड्यातील स्ट्रॉबेरी चांगली बहरली असून, उत्पादनही सुरू झाले आहे. सातपुड्यातील सुमारे ३० शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. गेल्या पाच-सहा वर्षांपासून ही लागवड सुरू असली तरी सुरूवातीला अल्प प्रमाणात होती. यंदा मात्र लागवडीचे क्षेत्र काही प्रमाणात वाढले आहे. डाब आणि तोरणमाळ या थंड हवेच्या ठिकाणी या स्ट्रॉबेरीची लागवड झाली असून, उत्पादन आणि उत्पादीत मालाचा दर्जाही आता सुधारला आहे. हीच संधी साधत सातपुड्यातील स्ट्रॉबेरीला राज्यस्तरावर न्याय मिळावा यासाठी बैठकीच्या निमित्ताने पालकमंत्री अॅड.के.सी. पाडवी व जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी नाशिक येथे उपमुख्य मंत्र्यांना सातपुड्यातील स्ट्रॉबेरीची भेट देवून त्याची माहिती दिली. 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही स्ट्रॉबेरीच    चव चाखून या स्ट्रॉबेरीचे कौतुक केले. त्या गोडव्यातूनच नंदुरबार जिल्ह्याच्या वार्षिक आराखड्याच्या निधीत ६० कोटी ४३ लाख रूपयांची वाढ केली. पूर्वी राज्य समितीकडे शिफारस करण्यासाठी जिल्हा नियाेजन समितीने सर्व साधारण योजनेसाठी ६९ कोटी ५७ लाखांचा आराखडा मंजुरीला दिला होता. तो आता १३० कोटी रुपयांचा करण्यात आला आहे. 
या आराखड्या व्यतिरिक्त स्ट्राॅबेरी उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि ताेरणमाळ पर्यटन विकासासाठी निधी देण्याचेही आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिले. त्यासाठी सुमारे ५० कोटी रुपयांचा आराखडा जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच तयार केला आहे. हा आराखडा आता मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असून, त्या अंतर्गत स्ट्रॉबेरी शेती विकासाच्याही योजना समाविष्ट करण्यात येणार आहे. 
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर नंदुरबारला येताच जिल्हाधिकारी राजेंद्र भारूड यांनी सातपुड्यातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांची तातडीने बैठक घेवून त्यांच्याशी चर्चा केली.

Web Title: Strawberry sweets get 'funding'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.