सातपुड्यात स्ट्रॉबेरीची शेती फुलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 12:02 IST2021-02-07T12:02:32+5:302021-02-07T12:02:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आकांक्षित जिल्हा नंदुरबारमधील सातपुड्याच्या पर्वतराजीत आदिवासी बांधवांनी स्ट्रॉबेरी लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे. कृषी ...

Strawberry cultivation flourished in Satpuda | सातपुड्यात स्ट्रॉबेरीची शेती फुलली

सातपुड्यात स्ट्रॉबेरीची शेती फुलली

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आकांक्षित जिल्हा नंदुरबारमधील सातपुड्याच्या पर्वतराजीत आदिवासी बांधवांनी स्ट्रॉबेरी लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली युवकही आधुनिक पद्धतीने स्ट्रॉबेरीची लागवड करू लागले आहेत. येथील हवामान स्ट्रॉबेरीसाठी पोषक असल्याने दुर्गम डोंगराळ भागात शेती करणाऱ्या आदिवासी बांधवांना उत्पन्नाचे नवे साधन मिळाले आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील डाब गावात धीरसिंग आणि टेड्या पाडवी या दोन तरुण भावंडांनी पारंपरिक पिकांना बाजूला सारून स्ट्रॉबेरी लागवडीकडे लक्ष केंद्रित केले आहे. स्ट्रॉबेरी उत्पादनामुळे त्यांना इतर पिकांच्या तुलनेत अधिक आर्थिक लाभदेखील होत आहे. धीरसिंगला शिक्षण घेता आले नसले तरी शेतात परिश्रम करताना त्यांनी रात्री वाचनाची आवडही जोपासली. टेड्या याने बारावीचे शिक्षण पूर्ण केले. शेतात सतत नवे प्रयोग करण्याची या दोघांना आवड आहे. त्यातूनच स्ट्रॉबेरीचे उत्पन्न घेण्याची कल्पना समोर आली. डाब येथे २००७ पासून स्ट्रॉबेरीची लागवड होत आहे. मात्र, शेतकरी पारंपरिक पद्धतीने लागवड करीत असल्याने त्यांना पूर्णत: यश आले नाही. कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महाबळेश्वर येथे शेतीसहलीचे आयोजन केले. या सहलीत दोघा भावंडांनी सहभाग घेतला आणि मिळालेल्या संधीचा पुरेपूर उपयोग करीत आपल्याकडील वडिलोपार्जित जमिनीवर नव्या तंत्राने स्ट्रॉबेरीची लागवड केली. पूर्वी वडिलांच्या नावावरील दोन एकर आणि वनपट्टा म्हणून मिळालेल्या चार एकर जमिनीवर गहू, हरभरा अशी पारंपरिक पिके घेतली जात असे. त्याजागी धीरसिंग यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली. काही भागात हरभरा आणि भगर लागवडदेखील केली आहे. त्यांनी स्ट्रॉबेरी लागवडीसाठी घेतलेले परिश्रम आणि केलेले प्रयत्नदेखील तेवढेच महत्त्वाचे ठरले. त्यांनी नाशिक येथून स्ट्रॉबेरीची रोपे आणली. स्वत: मल्चिंग पेपर आणि ठिबक सिंचनसाठी खर्च केला. शेती सहलीच्या माध्यमातून महाबळेश्वर येथील तज्ज्ञ शेतकरी व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. नुकसान टाळण्यासाठी कीड नियंत्रक चिकट सापळ्यासारख्या पद्धतीचा अवलंब केल्यान त्यांना फायदा झाला.

मोठ्या बाजारपेठेत पोहोचण्यासाठी प्रयत्न
 धीरसिंग यांनी करार शेतीच्या माध्यमातून स्ट्रॉबेरीचे क्षेत्र वाढविले आहे. इतर स्थानिक शेतकऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी स्ट्रॉबेरीची          लागवड केली आहे. पॅकेजिंगसाठी स्थानिक पातळीवर मिळणाऱ्या खोक्यांचा वापर करून स्ट्रॉबेरीची विक्री करण्यात येते. नंदुरबारच्या व्यापाऱ्यांनादेखील स्ट्रॉबेरीची विक्री करण्यात येत आहे. शेतीतील नवे तंत्र आणि सोबतीला असलेली प्रयोगशीलता यामुळे दोन्ही भावांनी स्ट्रॉबेरीच्या उत्पादनात यश मिळविले आहे. आता त्यांना वेध लागले ते स्ट्रॉबेरीचे क्षेत्र वाढवायचे आणि तिचे ब्रँडींग करून मोठ्या शहरापर्यंत पोहोचावयाचे.

गेल्यावर्षी दोन लाखांचे उत्पन्न मिळाले तर यावर्षी तीन लाखांपर्यंत उत्पन्न येईल. साधारण ८० ते १२० रुपये प्रतिकिलो असा भाव मिळत आहे. चांगले पॅकेजिंग आणि ब्रँडीग करून मोठ्या शहरांत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. शेतीत नवे तंत्र वापरले त्याचा लाभ निश्चित होतो.
-धीरसिंग पाडवी, शेतकरी, डाब, ता.अक्कलकुवा.

अक्कलकुवा तालुक्यातील डाब परिसरातील २५ शेतकरी स्ट्रॉबेरीची लागवड करतात. साधारणत १० ते १२ एकरवर स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जाते. एक एकरवर ३० क्विंटल होणारे उत्पादन ४० क्विंटलपर्यंत व्हावे यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.
-अविनाश खैरनार, मंडळ कृषी अधिकारी.

Web Title: Strawberry cultivation flourished in Satpuda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.