सातपुड्याची स्ट्राॅबेरी निघाली उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 12:54 IST2021-02-10T12:54:31+5:302021-02-10T12:54:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सातपुड्यातील स्ट्रॉबेरी आता महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरी पेक्षाही चांगल्या प्रतिची उत्पादीत होत असल्याने जिल्हाधिकारी बुधवारी नाशिक ...

Strawberries from Satpuda went to meet the Deputy Chief Minister | सातपुड्याची स्ट्राॅबेरी निघाली उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीला

सातपुड्याची स्ट्राॅबेरी निघाली उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीला

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सातपुड्यातील स्ट्रॉबेरी आता महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरी पेक्षाही चांगल्या प्रतिची उत्पादीत होत असल्याने जिल्हाधिकारी बुधवारी नाशिक येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या स्ट्राॅबेरीची भेट देणार आहे. या भेटी बराेबरच स्ट्रॉबेरीला न्याय मिळावा म्हणून तोरणमाळ पर्यटन विकासाच्या ५० कोटींचा प्रस्तावही ते सादर करणार आहेत.
बुधवारी राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांची विकासासंदर्भातील बैठक होणार आहे. या बैठकीत उत्तर महाराष्ट्रातील लोक प्रतिनिधी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड हे देखील या बैठकीला जात असून, सातपुड्यातील पर्यटन विकासाला न्याय मिळावा यासाठी ते उपमुख्यमंत्र्याना स्ट्रॉबेरी भेट देणार आहे. या स्ट्राॅबेरीचे उत्पादन नुकतेच सुरू झाले असून, त्याची चव ही महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीपेक्षा वरचढ ठरली आहे. तोरणमाळसह डाब व इतर परिसरात अनेक शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. या स्ट्रॉबेरीला बाजारपेठेसाठी सुविधा व्हावी व शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे या मागणीबरोबरच तोरणमाळ विकासाचा सुमारे ५० कोटी रूपयांचा आराखडा ते सादर करणार आहेत. तोरणमाळ हे पर्यटन विकासाच्या यादीत ब दर्जा देण्यात आला असून, त्यानुसार त्याचा विकास करण्यासाठी हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी ‘लाेकमत’शी बोलताना दिली.

Web Title: Strawberries from Satpuda went to meet the Deputy Chief Minister