राष्ट्रीय बँकांतील खातेधारकांना अजब नियमांचा मनस्ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:21 IST2021-07-02T04:21:05+5:302021-07-02T04:21:05+5:30
प्रकाशा येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत काही ज्येष्ठ नागरिक आपल्या बचत खात्यातून पैसे काढण्यासाठी गेले असता त्यांनी पैसे काढण्यासाठी ...

राष्ट्रीय बँकांतील खातेधारकांना अजब नियमांचा मनस्ताप
प्रकाशा येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत काही ज्येष्ठ नागरिक आपल्या बचत खात्यातून पैसे काढण्यासाठी गेले असता त्यांनी पैसे काढण्यासाठी स्लिप भरून संबंधित बँक कर्मचाऱ्याकडे दिली असता कर्मचाऱ्याने हा पर्याय नाकारला व चेक बुक धारकांसाठी पैसे काढण्यासाठी फक्त धनादेशचा वापर करावा असे सूचित केले. ग्राहकांनी जास्तीची विचारपूस केल्यावर हा नियम रिझर्व्ह बँकेकडून लागू करण्यात आला आहे, असे शाखाधिकाऱ्यांनी सांगितले.
या आदेशाच्या परिपत्रकाची मागणी केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. खर तर शाखेने ग्राहकांचा हितासाठी नियमांची यादी किंवा पत्रकाचा फलक शाखेत लावायला हवा. हा नियम ज्येष्ठ किंवा साधारण ग्राहकासाठी कोरोना काळात डोकेदुखी ठरू शकतो. ३० ते ४० टक्के खातेदार हे सामान्य कुटुंबातील आणि जेमतेम आर्थिक परिस्थितीतील आहेत. हे ग्राहक पैसे काढण्यासाठी लांबून प्रवास करतात, लांबलचक रांगेत उभे राहून मग त्यांना या विशिष्ट नियमाला सामोरे जावे लागत आहे. ग्राहक वर्गात या नियमाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे व हे बघता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या नियमाबद्दल फेर विचार करावा, असे ग्राहकांचे म्हणणे असून, ज्या शाखेचे खातेदार असतील त्या शाखेत रक्कम धनादेशविना मिळावयास हवी अशी मागणी महाराष्ट्र ग्राहक पंचायत सदस्य कोमलसिंग गिरासे यांनी केली आहे.