गावात बस मुक्कामी थांबावी यासाठी बलदाणे ग्रामस्थांचे बस रोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 12:32 IST2020-02-02T12:32:22+5:302020-02-02T12:32:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बलवंड : नंदुरबार आगारातून सुटणारी बलवंड मुक्कामी बस पुन्हा पुढील बळसाणे मुक्कामाला हलविण्याचा आगार प्रमुखांच्या निर्णयाविरोधात ...

गावात बस मुक्कामी थांबावी यासाठी बलदाणे ग्रामस्थांचे बस रोको आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
बलवंड : नंदुरबार आगारातून सुटणारी बलवंड मुक्कामी बस पुन्हा पुढील बळसाणे मुक्कामाला हलविण्याचा आगार प्रमुखांच्या निर्णयाविरोधात बलवंड ग्रामस्थांतर्फे पुन्हा बस रोको आंदोलन करण्यात आले. यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
नंदुरबार आगारातून सायंकाळी साडेपाच वाजता बलवंड मुक्कामासाठी १० वर्षापासून शालेय विद्यार्थ्यांकरीता ही बस सुरू आहे. शनिमांडळ आणि नंदुरबार येथे शिक्षणाकरीता जाणाºया विद्यार्थ्यांसाठी ही बस सोयीची असल्याने ती बलवंड येथून पूर्णपणे भरते. परंतु गेल्या महिन्यापासून ही बस बलवंडपासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या बळसाणे येथे मुक्कामी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परिणामी विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून, शैक्षणिक नुकसानदेखील होत आहे.
याबाबत आगार प्रमुखांना वेळोवेळी निवेदन देवूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने ग्रामस्थ व पालकांनी बलवंडला बस रोको आंदोलन करून बसचा पुढील मुक्काम बंद पाडला. यानंतर पुन्हा गुरूवारी आगार प्रमुखांनी ही बस बळसाणे येथे मुक्कामी पाठविण्याचा निर्णय घेतल्याचे विद्यार्थ्यांना समजताच त्यांनी पालकांना भ्रमणध्वनीद्वारे कळविले असता पालकांनी बलवंड येथील आगारात बस आल्यावर रोखून ठेवल्याने बसचालक युवराज भिल यांनी आगार प्रमुखांना या घटनेची माहिती दिली.
दरम्यान आगार प्रमुखांनी पालक रमेश ठाकूर यांच्याशी अरेरावी करीत बस सोडली नाही तर पोलीस पाठवू असे सांगितल्याने ग्रामस्थ चांगलेच संतप्त झाले होते. या वेळी आगार प्रमुख स्वत: येत नाही तोवर बस मार्गस्थ करणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्यानंतर राज्य परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर ही बस बलवंड येथेच मुक्कामी राहील, अशी ग्वाही मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.