लसीकरणाबाबत अजूनही गैरसमज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:33 IST2021-04-23T04:33:02+5:302021-04-23T04:33:02+5:30
कोविड-१९ चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने सध्या शाळा बंद आहेत. त्यामुळे शासनाने शिक्षकांच्या सेवा अधिग्रहित करून कोरोनाबाबत जनजागृती ...

लसीकरणाबाबत अजूनही गैरसमज
कोविड-१९ चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने सध्या शाळा बंद आहेत. त्यामुळे शासनाने शिक्षकांच्या सेवा अधिग्रहित करून कोरोनाबाबत जनजागृती व लसीकरणासाठी ४५ वर्षांवरील नागरिकांच्या सर्वेक्षणाची जबाबदारी शिक्षकांवर सोपवली आहे. शहादा शहरात मोठ्या संख्येने शिक्षक प्रामाणिकपणे व जीव धोक्यात घालून सर्वेक्षणाचे काम करीत आहेत. मात्र, या कामात शिक्षकांना अनेक बरेवाईट अनुभव येत आहेत. विशेषतः नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत अनेक गैरसमज असल्याचे निदर्शनास येत आहे. घरात वृद्ध गृहस्थ असूनही घरात ४५ वर्षांवरील कोणीही नसल्याचे खोटे सांगितले जात आहे. विशेषतः डायबेटिस रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरणाबद्दल भीती असल्याचे समोर येत आहे. काही ठिकाणी तर सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या शिक्षकांना धमकावण्याचे, अरेरावी करण्याचे प्रकारही घडले आहेत. मात्र, तरीही कर्तव्यावर असलेल्या शिक्षकांकडून अशा नागरिकांची समजूत काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत. लसीकरण कोरोनापासून बचाव करू शकते, लसीकरण १०० टक्के सुरक्षित असल्याचे शिक्षकांकडून सांगण्यात येत आहे. शहरातील काही वाॅर्डांत मात्र शिक्षकांना चांगला अनुभवही मिळत आहे. नागरिक स्वतःहून लसीकरण झाल्याचे सांगत आहेत. कोविड-१९ च्या या संकटकाळातही शिक्षक स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोकांच्या लसीकरणासाठी गल्लोगल्ली भटकत आहेत. याबद्दलही शिक्षकांना जनतेतून धन्यवाद मिळत आहेत. गटशिक्षणाधिकारी उषा पेंढारकर व प्रशासन अधिकारी भावेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वेक्षणाचे काम सुरू आहे.