बिरसा क्रांती दलाचे तहसीलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:38 IST2021-06-09T04:38:00+5:302021-06-09T04:38:00+5:30
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ५ मे रोजी आदिवासी समाजाची महिला तलाठी निशा पावरा ह्या आपले शासकीय ...

बिरसा क्रांती दलाचे तहसीलदारांना निवेदन
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ५ मे रोजी आदिवासी समाजाची महिला तलाठी निशा पावरा ह्या आपले शासकीय कर्तव्य बजावत असताना नंदुरबार येथील भाजपचे नगरसेवक गौरव चौधरी यांनी जातीवाचक शिवीगाळ करून अमानुष मारहाण केली आहे. ही घटना अत्यंत निंदनीय असून माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेचा आम्ही आदिवासी समाजातर्फे जाहीर निषेध करतो. अवैध गौण खनिज नियंत्रण पथकातील आदिवासी महिला शासकीय कर्मचारी शासकीय कर्तव्य बजावत असताना निशा पावरा यांना नंदुरबार येथील भाजप नगरसेवक गौरव चौधरी यांनी जातीवाचक शिवीगाळ करीत मारहाण केली व धमकीही दिली आहे. ही घटना स्त्रीच्या अब्रूवर घाला घालणारी असून आदिवासी महिला कर्मचाऱ्यावर अन्यायकारक करणारी आहे. आरोपी नगरसेवकावर शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, शासकीय कर्तव्य बजावत असताना महिला कर्मचाऱ्यास मारहाण करणे, शासकीय कर्मचाऱ्यास धमकी व दमदाटी करणे, जमावबंदी आदेश असताना जमाव जमवून शासकीय कर्मचाऱ्यास धाक देणे, दबाव आणणे, महिलेचा विनयभंग करणे, महिलेस लज्जा येईल अशा अश्लील भाषेत शिवीगाळ करणे, ही महिला आदिवासी समाजाची असल्यामुळे अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावेत व आरोपीस तत्काळ अटक करून कठोर शिक्षा करण्यात यावी. तसेच या नगरसेवकाचे पद व त्याचा रेती वाहतूक परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा. या घटनेत आरोपी नगरसेवकाच्या गैरकृत्यात सामील असणाऱ्या व आरोपीस साथ देणाऱ्या ट्रक-डंपर चालक व इतर संबंधित आरोपींवरही कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी व दोषी नगरसेवकावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.