सोंगाड्या पार्टी व तमाशा लोककलावंतांचे उदरनिर्वाहाचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:33 IST2021-01-19T04:33:40+5:302021-01-19T04:33:40+5:30
नंदुरबार जिल्ह्यात ४०० पेक्षा अधिक वादक, गायक आणि अन्य कलाकार असून सर्वच ठिकाणी कार्यक्रम बंद असल्याने त्यांच्या दैनंदिन अन्नपाण्याचा ...

सोंगाड्या पार्टी व तमाशा लोककलावंतांचे उदरनिर्वाहाचे हाल
नंदुरबार जिल्ह्यात ४०० पेक्षा अधिक वादक, गायक आणि अन्य कलाकार असून सर्वच ठिकाणी कार्यक्रम बंद असल्याने त्यांच्या दैनंदिन अन्नपाण्याचा प्रश्न गंभीर हाेत चालला आहे. जिल्ह्यातील यात्रोत्सव रद्द होत असल्याने ऐन कमाईच्या काळात तमाशा व सोंगाड्या पार्टीचे कार्यक्रम बंद असल्यामुळे कलाकारांना दैनंदिन व इतर खर्चाचा कलाकारांपुढे प्रश्न निर्माण झाला आहे. लोककला कार्यक्रम सादरीकरणास शासनाने परवानगी द्यावी, या मागणीसाठी संघटनांकडून वेेळोवेळी निवेदन देण्यात आले आहेत.
लोककलावंतांना शासनाकडून अनुदान देण्यात येत नसल्याने शासनाने कलाकारांना अनुदान जाहीर करावे किंवा कार्यक्रम करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी वारंवार प्रशासनाकडे करण्यात येत आहे. सोंगाड्या कलाकार सातपुड्यातील दुर्गम भागात जाऊन जनजागृती व समाजप्रबोधनाचे काम करत असतात. मात्र, लोकमनोरंजनाचे सर्व कार्यक्रम बंद करण्यात आल्याने कलाकारांचा हिरमाेड झाला आहे. शासनाने आदिवासी सांस्कृतिक लोककला महोत्सवाचे आयोजन केले पाहिजे, त्यामुळे आदिवासी लोककला व साहित्याचे जतन होईल.
गेेल्या वर्षापासून लाेककला कार्यक्रम बंद असल्याने जिल्ह्यातील तमाशा व सोंगाड्या रोडाली पार्टीचे कलाकार उदरनिर्वाह करण्यासाठी भटकंती करत आहेत. शेतातील कामे, बांधकाम मजूर व ऊसतोडणी कामासाठी कलाकार जिल्ह्यातील राज्य सीमावर्ती भागात काम मिळवण्यासाठी स्थलांतर करत आहेत. आदिवासी संस्कृती, रूढी-परंपरांचे जतन करणाऱ्या कलांवतांना उदरनिर्वाह करण्यासाठी प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी दखल घ्यावी, अशी अपेक्षा लोककलावंतांकडून व्यक्त होत आहे.
कलाकारांना दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी शासनाकडून मानधन सुरू करण्यात यावे, आदिवासी कला व साहित्याचे जतन करण्यासाठी शासनाने कलामहोत्सवाचे आयोजन केले पाहिजे.
नामदेव गिरजा वळवी, जिल्हा अध्यक्ष, आदिवासी रोडाली लोककला असोसिएशन, नंदुरबार