लसीकरणाबाबत राज्य सरकारने कालबद्ध कार्यक्रम आखावा- खासदार हीना गावीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:05 IST2021-09-02T05:05:22+5:302021-09-02T05:05:22+5:30

देशात ऑगस्टपूर्वी ६० कोटी लसीकरणाचा टप्पा गाठला जाणार नाही, असा अपप्रचार सुरू होता. मात्र, ३१ ऑगस्ट रोजी तब्बल ६५ ...

The state government should hold a time bound program for vaccination - MP Heena Gavit | लसीकरणाबाबत राज्य सरकारने कालबद्ध कार्यक्रम आखावा- खासदार हीना गावीत

लसीकरणाबाबत राज्य सरकारने कालबद्ध कार्यक्रम आखावा- खासदार हीना गावीत

देशात ऑगस्टपूर्वी ६० कोटी लसीकरणाचा टप्पा गाठला जाणार नाही, असा अपप्रचार सुरू होता. मात्र, ३१ ऑगस्ट रोजी तब्बल ६५ कोटी १२ लाख लोकांचे लसीकरण पूर्ण करून मोदी सरकारने या अपप्रचारास चोख चपराक लगावली आहे. याच वेगाने राज्यांनीदेखील लसीकरण करावे व निश्चित धोरण आखून राज्यातील सर्व नागरिकांना वेळेवर लस उपलब्ध करून द्यावी. याकरिता लसींच्या मात्रांचे नियोजनबद्ध वाटपही केंद्र सरकारने केले असून महाराष्ट्रास गरजेहून अधिक मात्रा उपलब्ध झाल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रास ८६ लाख ७४ हजार लस मात्रा वितरित करण्यात येणार होत्या, त्याऐवजी प्रत्यक्षात ९१.८१ लाख म्हणजे पाच लाखांहून अधिक मात्रा पुरविण्यात आल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. असे असतानाही, राज्याच्या अनेक लसीकरण केंद्रांवरून आजही नागरिकांना हात हलवत परतावे लागत आहे, तर अनेक केंद्रांवर लस नसल्याचे कारण देत ऐनवेळी लसीकरण थांबविले जात आहे. ठाकरे सरकारकडे लसीकरणाचा नेमका कार्यक्रम नाही आणि मोफत व सशुल्क लसीकरण वाटपाचे धोरणही नाही. त्यामुळे जनतेचे हाल सुरूच आहेत, असा आरोप खासदार डॉ. हीना गावीत यांनी या पत्रकाद्वारे केला आहे.

केवळ कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती दाखवून जनतेस घराबाहेर पडण्यापासून रोखणे एवढा एककलमी कार्यक्रम ठाकरे सरकार राबवत असल्याने महाराष्ट्र पुन्हा बेरोजगारी, मंदी आणि नैराश्याच्या सावटात ढकलला जात आहे. त्यातच, मोफत लसीकरण केंद्रांवर लस नाही आणि खासगी केंद्रावर सशुल्क लसीकरण मात्र उपलब्ध असल्याने लसीकरणाच्या मोहिमेविषयी संशय व्यक्त होत असून सामान्य नागरिकांना मोफत लस उपलब्ध करून देण्यात राज्य सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही खासदार डॉ हीना गावीत यांनी केला.

लसीकरणाचे धोरणच नसल्यामुळेच महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांत कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत असून कोरोना रोखण्याच्या राष्ट्रीय मोहिमेस पुन्हा महाराष्ट्रातून खीळ बसेल, अशी भीती त्यांनी या पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे. देशात महत्त्वाकांक्षी लसीकरणाचा विक्रमी टप्पा पूर्ण करून जगासमोर आदर्श उभा केल्याबद्दल खासदार डॉ. हीना गावीत यांनी या पत्रकाद्वारे पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन केले आहे.

Web Title: The state government should hold a time bound program for vaccination - MP Heena Gavit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.