पाच दिवसांच्या आठवड्यातही कर्मचारी वेळेवर येईनात; मग आम्ही काम सांगायचे कोणाला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:37 IST2021-09-09T04:37:20+5:302021-09-09T04:37:20+5:30
सभेच्या प्रारंभी सदस्यांचे रजेचे अर्ज, सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे, शासन निर्णयांचे वाचन व मागील सभेचे इतिवृत्त व ठरावांचे वाचन करण्यात ...

पाच दिवसांच्या आठवड्यातही कर्मचारी वेळेवर येईनात; मग आम्ही काम सांगायचे कोणाला?
सभेच्या प्रारंभी सदस्यांचे रजेचे अर्ज, सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे, शासन निर्णयांचे वाचन व मागील सभेचे इतिवृत्त व ठरावांचे वाचन करण्यात आले. सभेच्या प्रारंभी विषयांची मांडणी सुरू असताना सदस्य गणेश पराडके यांनी जिल्हा परिषदेतील कर्मचारी वेळेवर कामावर येत नसल्याचे सांगून लक्ष वेधून घेतले. सकाळी ९.४५ची कामाची वेळ असताना अनेक जण उशिरा येत असून त्यामुळे कामे होत नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, सदस्य देवमन पवार यांनी ‘पंचायत समिती कार्यालयातही दुपारी जेवणाची वेळ नेमकी कोणती?’ असा प्रश्न प्रशासनापुढे उपस्थित केला होता.
यावर उत्तर देताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश देत पाच ते सहा जणांना विनावेतन केल्याची माहिती दिली. येत्या काळात हे प्रकार सुरूच राहिल्यास कर्मचाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
भरत गावितांच्या आरोपाने खळबळ
दरम्यान, सभेत जिल्हा परिषदेचे सदस्य भरत गावित यांनी विधिमंडळ समितीच्या दाैऱ्यानिमित्त शिक्षकांकडून शिक्षण विभागाकडून प्रत्येकी २०० रुपये गोळा करण्यात येत असल्याचा खळबळजनक आरोप सभेत केला. शिक्षण विभागाने शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीवर भर द्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला. सभेत आरोप करताना भरत गावित यांनी अपंग युनिटअंतर्गत भरती करण्यात आलेल्या शिक्षकांच्या नियुक्त्यांसाठी पैसे घेण्यात आल्याचाही आरोप केला. जिल्ह्यात राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेकडून अपंग युनिटअंतर्गत २४ शिक्षकांच्या नुकत्याच नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या नियुक्त्यांची फाईल सामान्य प्रशासनकडे न देता थेट मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आल्याचे तसेच यात रोखीचा व्यवहार झाल्याचा मोठा दावा त्यांनी यावेळी केला. यावेळी त्यांच्या दाव्याचे खंडन करीत शिक्षणाधिकारी डाॅ. राहुल चाैधरी यांनी संबंधित शिक्षकांच्या नियुक्त्यांचे आदेश हे शिक्षण परिषदेकडून करण्यात आल्याची माहिती दिली. शिक्षकांच्या नियुक्त्या ह्या वरिष्ठ पातळीवरून सर्व सहा तालुक्यांत झाल्या असल्याची माहिती त्यांनी दिली. इतर सदस्यांनीही त्या शिक्षकांची नियुक्ती ही धडगाव व अक्कलकुवा तालुक्यांत व्हावी, अशी मागणी केली.
बैठकीत एकूण २० विषयांना मंजुरी देण्यात आली.
लिम्पी लसीकरणासाठी तातडीने २० लाख मंजूर
नवापूर तालुक्यात गुरांवर आलेल्या विषाणूजन्य लिम्पी आजारावर मात करण्यासाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने या गुरांच्या लसीकरणासाठी निधी देण्याची मागणी करण्यात आली. या मागणीला तातडीने मंजुरी देत जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाला २० लाख रुपयांची तरतूद करण्याचे आदेश अध्यक्षा ॲड. सीमा वळवी यांनी दिले. हा आजार नवापूर तालुक्यात रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी करण्यात आली.