कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हा परिषदेकडून ग्रामीण भागात फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 12:38 IST2020-03-26T12:38:21+5:302020-03-26T12:38:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेने ग्रामीण भागात उपाययोजना सुरु केल्या आहेत़ याअंतर्गत प्रत्येक गाव ...

Spraying from the Zilla Parishad in rural areas to prevent corona | कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हा परिषदेकडून ग्रामीण भागात फवारणी

कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हा परिषदेकडून ग्रामीण भागात फवारणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेने ग्रामीण भागात उपाययोजना सुरु केल्या आहेत़ याअंतर्गत प्रत्येक गाव व पाड्यात जंतुनाशक फवारणी करणे, गावांमध्ये आलेल्या बाहेरील व्यक्तींची माहिती संकलित करणे व त्या व्यक्तीला होम क्वारंटाइन करणे, या उपाय योजनांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली.
भारतात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव होत असल्याचे दिसून आल्यानंतर उपाययोजनांना वेग आला आहे़ या आजाराच्या दुष्परिणामांचे गांभीर्य लक्षात घेत शासन उपाययोजना करत आहे. राज्य सरकारने यापूर्वीच लॉकडाऊनची घोषणा केली होती़ त्यानंतर केंद्र सरकारनेही लॉकडाऊन करण्याचे निर्देश दिले आहेत़ नंदुरबार जिल्ह्यात यानुसार कामकाज सुरु आहे़ ग्रामीण भागात जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील सर्व गावांतील पान ठेले, पान टपऱ्या व गुटखा तंबाखू विक्रीची दुकाने सील करण्याची कार्यवाही केली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये सोडियम हायड्रोक्लोराईड औषधाची फवारणी करण्यावर भर देण्यात येत आहे़ कोरोनाच्या प्रतिबंधासाठी शासनाच्या सूचना जनतेपर्यंत पोचाव्यात यासाठी कोतवालाकडून प्रत्येक गावात दवंडी दिली जात आहे. शहरालगतच्या ग्रामपंचायतींमध्ये शहरी भागात सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती आणि त्यांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रत्येक तालुकास्तरावर सहाय्यक गटविकास अधिकारी तसेच ग्राम विस्तार अधिकारी यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी सोपविलेल्या गावांमध्ये जनजागृती करण्याबरोबरच औषध फवारणी व स्वच्छता याविषयी कार्यवाही सुरू केलेली आहे. नंदुरबार जिल्ह्यात बाहेरून आलेल्या नागरिकांची माहिती संकलित करून, अश्यांना होम क्वारंटाईन करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
जिल्ह्यातील नागरिकांना सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे दिसून आल्यास त्यांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालयात उपचार करून घेण्याची सक्त ताकीद देण्यात आली असून नागरिकांनी खबरदारी घेऊन उपाययोजनांना करण्याचे कळवण्यात आले आहे़
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाची बाधा झालेली एकही व्यक्ती आढळून आलेली नसल्याने इतर कोणासह प्रादुर्भाव झालेला नसल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी सांगितले आहे़

Web Title: Spraying from the Zilla Parishad in rural areas to prevent corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.