कोरोनाची संपर्क साखळी तोडण्यासाठी शहादा तालुक्यात विशेष मोहिम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 12:14 IST2020-09-15T12:14:26+5:302020-09-15T12:14:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यात कोविडची रूग्ण संख्या वाढत आहे. कोविडची संपर्क साखळी तोडण्याकरिता जास्तीत जास्त संपर्क शोध ...

कोरोनाची संपर्क साखळी तोडण्यासाठी शहादा तालुक्यात विशेष मोहिम
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : तालुक्यात कोविडची रूग्ण संख्या वाढत आहे. कोविडची संपर्क साखळी तोडण्याकरिता जास्तीत जास्त संपर्क शोध व चाचण्या यावर शहादा स्थानिक प्रशासनाकडून भर दिला जात आहे. यासाठी प्रशासनातर्फे विशेष तपासणी मोहिमेचे आयोजन करण्यात येत असून, तालुक्यातील शेल्टी व मंदाणे येथील ग्रामस्थांनी त्यास चांगला प्रतिसाद दिला.
१३ सप्टेंबरच्या रात्री पर्यंत तालुक्यात कोरोना विषाणू बाधित रूग्णांची संख्या एक हजार ३४० झाली आहे. विशेषत: गेल्या काही दिवसांपासून सरासरी ४० ते ५० बाधित रूग्ण ग्रामीण भागात आढळून येत असल्याने प्रशासनाने ग्रामीण भागात चाचण्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. जनजागृती मोहीम राबविण्यासोबत बाधित रूग्ण आढळून आल्यास त्याच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करणे, असे नियोजन करण्यात आले आहे. त्याचाच भाग म्हणून ज्या गावांमध्ये वारंवार व जास्त संख्येने रूग्ण आढळत आहेत, अशा गावातील नियमित संपर्कात येणारे व्यावसायिक जसे किराणा दुकानदार, दुध वितरक, भाजीपाला व्यावसायिक, केश कर्तनकार इत्यादी रूग्णाच्या दुरूनही संपर्कात आलेल्यांना तपासणीसाठी स्वॅब देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषत: वडाळी, लोणखेडा, मंदाणे, डोंगरगांव, असलोद कळंबू, ब्राह्मणपुरी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
प्रशासनाने आयोजित केलेल्या विशेष तपासणी मोहिमेत तालुक्यातील शेल्टी या गावाने मात्र केवळ सहा रूग्ण संख्या असूनही तब्बल ७८ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी देऊन एक उदाहरण प्रस्थापित केले आहे. त्याचप्रमाणे मंदाणे गावात ६० नागरिकांनी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. अन्य गावांमध्ये विशेष तपासणी मोहीम प्रशासनाच्यावतीने लवकरच राबविली जाणार आहे.
या मोहिमेंतर्गत नव्याने बाधित रूग्ण आढळून आल्यास संबंधित रूग्णाला अन्य लोकांपासूून लवकर वेगळे करता येऊन पुढील प्रसार रोखता येणे सहज शक्य होणार आहे. तसेच रूग्ण बरे होण्याचीही शक्यता वाढून मृत्युदर कमी होतो. तरी प्रशासनातर्फे पुन्हा एकदा सौम्य लक्षणे असलेल्यांनी, गंभीर आजार असलेल्यांनी, वयस्कर व्यक्तींनी व संपर्कातील व्यक्तींनी स्वत:हुन पुढे येऊन स्वॅब देण्याचे आवाहन प्रांताधिकरी डॉ.चेतन गिरासे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी व प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.