शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी शिक्षण विभागाची विशेष मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:36 IST2021-03-01T04:36:12+5:302021-03-01T04:36:12+5:30
बैठकीच्या प्रास्ताविकात शिक्षणाधिकारी डाॅ. राहुल चाैधरी यांनी २३ फेब्रुवारी २०२१च्या शासन निर्णयातील ठळक मुद्द्यांवर चर्चा घडवून आणली. यावेळी त्यांनी ...

शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी शिक्षण विभागाची विशेष मोहीम
बैठकीच्या प्रास्ताविकात शिक्षणाधिकारी डाॅ. राहुल चाैधरी यांनी २३ फेब्रुवारी २०२१च्या शासन निर्णयातील ठळक मुद्द्यांवर चर्चा घडवून आणली. यावेळी त्यांनी या मोहिमेत ०६ ते १८ वयोगटातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेताना जिल्हा, तालुका, केंद्र, वाॅर्ड, गाव, अशा विविध स्तरावर स्थापन करण्यास सूचना देण्यात आल्या. तसेच सर्वेक्षण हे प्रत्येक गावात होणार आहे. वाड्यावस्त्या, गजबजलेल्या वस्त्या, रेल्वे स्टेशन, बसस्थानक, झोपडपट्टी, लोककलावंतांची वस्ती, फूटपाथ, गुऱ्हाळघर, साखर कारखाने, वीटभट्ट्या, दगडखाण, मोठे बांधकामे, शेत शिवार, ऊसतोड कामगारांची वस्ती, स्थलांतरित होऊन आलेल्या कुटुंबांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. शिक्षक, अंगणवाडीसेविका व मदतनीस यांच्या माध्यमातून हे सर्वेक्षण होणार आहे. १ मार्चपासून हे सर्वेक्षण सुरू होणार असून, १० मार्च रोजी त्याचा समारोप होणार आहे. मोहिमेत ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपंचायत यामधील जन्म-मृत्यू नोंदींचा वापर प्रामुख्याने करण्यात येणार आहे. कुटुंब सर्वेक्षण करताना तात्पुरते स्थलांतर करणारी कुटुंब व मूूळ वस्तीतून अन्य वस्तीत स्थलांतर होऊन आलेले कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
शोधमोहिमेची जबाबदारी पर्यवेक्षक म्हणून केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, अंगणवाडी पर्यवेक्षक यांची राहिला अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान, या मोहिमेंतर्गत प्रगणक म्हणून प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक, अंगणवाडीसेविका व मदतनीस तसेच नोडल अधिकारी एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा व तालुका बालविकास अधिकारी, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी, विस्तार अधिकारी यांची भूमिकाही शिक्षणाधिकारी डाॅ. चाैधरी यांनी स्पष्ट केली.
बैठकीत जिल्हाधिकारी डाॅ. भारुड यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, कोरोनामुळे अनेक कुटुंबांचे स्थलांतर झाले आहे. तीन ते सहा वयोगटातील बालक अंगणवाडी केंद्रात किंवा खासगी ज्यू के.जी, सिनिअर के.जी, एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे लाभ न घेणारे अशा बालकांना सामावून घेत ६ ते १८ वयोगटातील शाळाबाह्य बालकांचे सर्वेक्षण करण्याअगोदर सर्व शिक्षक व मुख्याध्यापकांनी शाळेवर हजर राहून वर्गखोली, पटांगण स्वच्छ करून कोविड नियमांचे पालन करून १०० टक्के पालन करण्यात यावे.
दरम्यान, डाॅ. भारुड यांनी सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील मुख्याध्यापकांनी शाळा बंद राहणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचना शेवटी केल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी गावडे यांनी सर्वेक्षण प्रभावी होण्यासाठी क्षेत्रीय व नोडल अधिकाऱ्यांनी सर्वेक्षणाचा वेळोवेळी आढावा घेण्याबाबत सूचना केल्या.
डाएटचे प्राचार्य भटकर यांनी शाळाबाह्य बालकांना शाळेत दाखल करणे तसेच कोरोनामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे अध्ययन भरून काढण्यासाठी प्रभावी अंमलबजावणीची अपेक्षा व्यक्त की, प्रकल्पाधिकारी पांडा यांनी आश्रमशाळांची माहिती दिली. अप्पर पोलीस अधीक्षक पवार यांनी शाळाबाह्य बालकांच्या सर्वेक्षणासाठी गृह विभाग तत्पर राहील, असे सांगितले. आभार उपशिक्षणाधिकारी डाॅ. युनूस पठाण यांनी मानले.