स्फोटसदृष्य आवाजाने नंदुरबारसह परिसर हादरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 12:33 IST2020-02-08T12:33:30+5:302020-02-08T12:33:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरासह तालुका दुपारी तीन वाजेच्या सुमारास स्फोटासारख्या आवाजाने हादरला. या आवाजामुळे अनेक घरांच्या भितींना ...

The sound of the explosion rocked the premises with Nandurbar | स्फोटसदृष्य आवाजाने नंदुरबारसह परिसर हादरला

स्फोटसदृष्य आवाजाने नंदुरबारसह परिसर हादरला

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरासह तालुका दुपारी तीन वाजेच्या सुमारास स्फोटासारख्या आवाजाने हादरला. या आवाजामुळे अनेक घरांच्या भितींना तडा गेला, काचेच्या खिडक्या आणि तावदाने फुटली. इमारती आणि घरे हालल्याने एकच धावपळ उडाली. नागरिकांनी घराबाहेर येवून आवाजाचा अंदाज घेतला. दरम्यान, या आवाजामुळे सायंकाळी उशीरापर्यंत विविध अफवा पसरविल्या गेल्या. परंतु झालेला आवाज हा फायटर विमानामुळे निर्माण झालेला सॉनिक बूमचा प्रकार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
शुक्रवारी दुपारी २.५५ ते ३.०० वाजेच्या दरम्यान अचानक स्फोट झाल्यासारखा आवाज आला. आवाजाचे क्षेत्र साधारणत: ३० ते ३५ किलोमिटर अंतरापर्यंत होते. एवढा मोठा आवाज प्रथमच नागरिकांनी ऐकल्यामुळे अनेकांच्या मनात भिती निर्माण झाली. प्रत्येकजण एकमेकांना याबाबत विचारणा करीत होते. सोशल मिडियावर देखील विविध संदेश फिरू लागले, परिणामी अफवा मोठ्या प्रमाणावर पसरल्या.
नागरिक भितीपोटी घराबाहेर...
प्रचंड आवाजाने घराच्या भिंती कंपन पावल्या, खिकक्या, दरवाजे हलले, काचेच्या खिडक्यांना तडे गेले. काही जणांच्या छताचे कौले खाली पडले. यामुळे नागरिक घराबाहेर पडले. कुठे काही अघटीत तर घडले नाही याची माहिती प्रत्येकजण घेवू लागले. लहान मुलं आणि महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर भितीचे वातावरण पसरले होते. शाळांमध्ये देखील विद्यार्थी दहशतीत होते.
प्रशासनही अनभिज्ञ...
प्रशासनाकडे देखील या आवाजानंतर साधारणत: अर्धा ते पाऊण तास काहीच माहिती नव्हती. पोलिसांनी ओझर येथील विमानतळावर याबाबत विचारणा केली. त्यानंतर या आवाजाचे गुड उकलण्यास मदत झाली. तोपर्यंत विविध अफवा सोशल मिडियावर व्हायरल झाल्या होत्या. काहींनी तर आधीच्या विमान अपघाताचे फोटो अपलोड करून नंदुरबारनजीक विमान कोसळल्याची अफवा पसरली. ती निस्तारतांना प्रशासन आणि पोलिसांचीही मोठी कसरत झाली.
आपत्ती व्यवस्थापन कक्ष...
अनेक नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधून विचारणा केली, परंतु या कक्षाचेच अस्तित्व नसल्याचे दिसून आले. परिणामी नागरिकांनी स्थानिक पोलीस ठाणे, वृत्तपत्रांची कार्यालये येथे विचारणा केली. त्यानंतर नागरिकांचे समाधान झाले.
आठ वर्षांपूर्वीची आठवण
आठ वर्षांपूर्वी प्रशिक्षीत विमान कमी उंचीवरून नंदुरबारच्या आकाशावरून उडत गेले. ते विमान समशेरपूरनजीक कोसळल्याची अफवा पसरली. संपुर्ण प्रशासन आणि नागरिकांनी तिकडे धाव घेतली. परंतु चौकशीअंती ती अफवाच असल्याचे निष्पन्न झाले. परंतु यामुळे मात्र, आपत्ती व्यवस्थापन, प्रशासन यांचे चांगलेच हसे झाले होते. त्याच घटनेची आठवण आजच्या स्फोटसदृष्य आवाजाने झाली. ती आठवणही अनेकांनी सोशल मिडियावर शेअर केली.

प्रशासनाने एटीसी व एचएएल ओझर येथे संपर्क साधला. पुणे येथून सुपर सॉनिक बूम फायटर जेट सुखोई विमान पुणे येथून नाशिक व एचएएलच्या अंडर फ्लार्इंग एरिया मध्ये सरावासाठी उड्डाण करीत होते. नंदुरबारच्या आकाशात निर्धारित उंचीपेक्षा कमी उंचीवरून उडत असल्यामुळे सुपरसोनिक बूमचा आवाज निर्माण झाला. हा आवाज प्रचंड असतो. जिल्ह्यात प्रथमच अशा प्रकारचा आवाज ऐकण्यास मिळाल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले होते.

Web Title: The sound of the explosion rocked the premises with Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.