पावसाळ्याची चाहूल लागताच मेंढपाळांची घराकडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:23 IST2021-06-02T04:23:21+5:302021-06-02T04:23:21+5:30
शेतकऱ्यांनी शेतातील पिके काढल्यावर रिकाम्या शेतात अनेक ठेलारी मेंढपाळ आपल्या मेंढ्या चारण्यासाठी दरवर्षी शहादा तालुक्यातील गावांमधे स्थलांतर करीत असतात. ...

पावसाळ्याची चाहूल लागताच मेंढपाळांची घराकडे वाटचाल
शेतकऱ्यांनी शेतातील पिके काढल्यावर रिकाम्या शेतात अनेक ठेलारी मेंढपाळ आपल्या मेंढ्या चारण्यासाठी दरवर्षी शहादा तालुक्यातील गावांमधे स्थलांतर करीत असतात. ज्या शेत शिवाराच्या परिसरात पाण्याची सोय असेल, तिथे मोकळ्या शेतात ते आपला संसार थाटत असतात. जेथे-जेथे मेंढ्यांसाठी चारा सापडेल, त्या शेतशिवारात मेंढपाळ आपल्या मेंढ्या चारत असतात. अनेक शेतकरी आपल्या शेतात लेंडी खत आणि मूत्र मिळावे म्हणून एका रात्रीचे ८०० ते एक हजार रुपये देऊन आपल्या शेतात मेंढ्या बसवतात. रासायनिक खताच्या वापरापेक्षा मेंढ्यांचे हे खत शेतीसाठी अतिशय उपयुक्त असते. अनेक ठिकाणी मेंढ्या बसवल्यानंतर किंवा ज्या परिसरात नांगरणी केली आहे, अशा ठिकाणाहून मेंढपाळ आपला मुक्काम हलवून दुसऱ्या गावातल्या शेती शिवारात स्थलांतर करतात. आठ दिवस, पंधरा दिवस, कधी महिन्याभरात मेंढपाळांना दुसऱ्या गावात स्थलांतर करावे लागते. पावसाळ्यातील चार महिने मेंढपाळ लोक आपल्या गावी राहिल्यानंतर मेंढ्यांच्या चराईसाठी दुसऱ्या जिल्ह्यात व तालुक्यात दरवर्षी स्थलांतर करीत असतात.