अनलॉक होताच सिव्हिलच्या अपघात विभागात वाढले रुग्ण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:33 IST2021-08-19T04:33:58+5:302021-08-19T04:33:58+5:30
नंदुरबार : निर्बंध शिथिल झाल्यानंतर वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली आहे. यातून नागरिकांना प्रवासाला मुभा मिळाली असल्याने अपघातांची संख्या ...

अनलॉक होताच सिव्हिलच्या अपघात विभागात वाढले रुग्ण!
नंदुरबार : निर्बंध शिथिल झाल्यानंतर वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली आहे. यातून नागरिकांना प्रवासाला मुभा मिळाली असल्याने अपघातांची संख्या वाढली असून परिणामी जिल्हा रुग्णालयाचा अपघात वाॅर्डात ५७ जण दाखल करण्यात आले आहेत.
जिल्हा रुग्णालयात गेल्या दीड वर्षात प्रथमच कोरोना व्यतिरिक्त इतर रुग्णांवरच्या उपचारांना गती देण्यात येत आहे. मॅटर्निटी वाॅर्डसह इतर सर्व वाॅर्डचे कामकाज सुरू झाले असल्याने रुग्णांची गर्दी वाढत आहे. दरम्यान जिल्ह्यात अनलाॅक झाल्याने अपघातांची संख्या वाढली आहे. हे अपघातग्रस्त रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येत असल्याने गेल्या आठवड्यापासून अपघात वाॅर्ड फुल्ल आहे.
नियमांचे पालन न करता वाहतूक जीवघेणी
गेल्या दोन आठवड्यात जिल्ह्याच्या विविध भागात अपघात वाढल्याचे दिसून आले आहे. खासकरून दुचाकींचे अपघात होत आहेत. बहुतांश दुचाकीस्वार हे नियमांचा भंग करत वाहने तीव्र वेगात चालवत असल्याने हे अपघात होत आहे. दरम्यान दाखल करण्यात आलेल्या प्रत्येक रुग्णाला योग्य त्या पद्धतीने उपचार देत बरे करण्याचा पूर्ण प्रयत्न होत असल्याचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. के.डी.सातपुते यांनी सांगितले.
कोविडमध्येही अपघात विभाग कार्यरत
मार्च महिन्यानंतर कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतरही जिल्हा रुग्णालयाचा अपघात कक्ष सुरळीतपणे सुरू होता. २०२० मध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतरही अपघात कक्ष सुरळीत सुरु होता. लाॅकडाऊनमुळे वाहतूकीवर निर्बंध आल्याने अपघातांची संख्या कमी झाली होती. यातही आंतरजिल्हा आणि आंतरराज्य वाहतूक बंद असल्याने अपघात कमीच झाले होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून वाहतूक सुरू झाल्याने महामार्गांवर अपघातांच्या घटना दैनंदिन सुरू झाल्याने अपघात कक्षात गर्दी होत आहे.
दररोज गर्दी
रुग्णालयात दैनंदिन तपासणीसाठी गर्दी होत असल्याचे दिसून आले आहे. सकाळी बाह्यरुग्ण तपासणी विभागात नागरिक थांबून असल्याचे दिसून आले.