From Solapur, 3 persons participated in the Tabligi Jamaat | सोलापूर येथून तब्लिगी जमाएतमध्ये सहभाग घेतलेले ११ जण नवापुरात

सोलापूर येथून तब्लिगी जमाएतमध्ये सहभाग घेतलेले ११ जण नवापुरात

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापुर : सोलापूर येथील तब्लिग जमाअतमधून परतलेल्या नवापुर तालुक्यातील ११ जणांना सावधगिरीचा उपाय म्हणुन शहरातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असुन त्यांचेवर आरोग्य विभागाचे पथक बारीक लक्ष ठेवून आहे. बुधवारी रात्री हे ११ जण नवापुरात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी पोलीसांसह याठिकाणी भेटी देत तातडीने कारवाई केली़
दिल्लीस्थित तब्लिग जमाअतच्या मुख्यालयात अडकुन पडलेल्या भाविकांपैकी काहींना कोरोना विषाणुची लागण झाल्याचे उघडकीस आल्यानंतर मुख्यालयातुन देशातील विविध ठिकाणी जमाअत मधे निघालेल्या भाविकांबद्दल चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. तालुक्यातील ११ जण देखील सोलापूर येथे जमाअतमधे गेले होते. चिंचपाडा येथील दोन व नवापुर शहरातील ९ जणांचा त्यात समावेश होता. ९ पैकी दोन जण चालक होते. हे ११ जण दिल्ली गेले नसले तरी त्यांनी राज्यातील सोलापुर भागात ४० दिवस काढले. राज्यात कोरोनाची भिती असल्याने व त्यातच कोरोनाच्या काळातच हे ११ जण परजिल्ह्यात राहुन आल्याने बुधवारी रात्री ते नवापुर येथे परतल्याचे प्रशासनास समजताच गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक दिगंबर शिंपी व आरोग्य विभागाचे सहकारी कर्मचारी यांनी त्या ११ जणांना विलगीकरण कक्षात दाखल केले.
आरोग्य विभागाचे एक डॉक्टर, एक प्रयोगशाळा तंत्रज्ञ व इतर तीन कर्मचारी यांच्या निगराणीखाली त्या सर्वांना ठेवण्यात आले असुन त्यांचे परिक्षण केले जात आहे. त्या पैकी कुणालाही सर्दी, खोकला किंवा कोरोनासारखे कुठलेही लक्षण नसले तरी विलगीकरण कक्षात सर्वांना स्वतंत्र ठेवण्यात आले असल्याची माहिती नंदकुमार वाळेकर यांनी दिली. दोन तीन दिवस त्यांच्या वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल पाहुन त्यांचे रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावे की नाही याचा निर्णय घेतला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.


जमाअत मधे जाण्याची परंपरा तशी पार पुरातन आहे. स्वखर्चाने व्यक्ती तीन दिवस, चाळीस दिवस, चार महिने किंवा पुर्ण वर्षभरासाठी जमाएत मध्ये जातात. परमेश्वराचा संदेश देत पाच वेळची नमाज अदा करणे, इस्लाम धमार्तील पाचही फर्जचा अंमल यासह मनुष्याचे जीवन पैंगबरांनी दाखवुन दिलेल्या मागार्नेच जगण्याचा संदेश जमाअतमधे जाणारे बांधव देतात. जमाअतमधे स्वत:चा स्वयंपाक स्वत: तयार करणे व इतर कामेही स्वत:लाच करावी लागतात. वाममागार्पासुन स्वत:चा बचाव करण्यासाठी जमाअत हे उत्तम माध्यम मानले गेले आहे. तीन दिवसाची जमाअत त्या त्या तालुक्यातच आयोजित होते. चाळीस दिवसाची जमाअत राज्यातच वा लगतच्या मात्र एकाच राज्यात काढली जाते. चार महिने किंवा वर्षभराची जमाअत लांबवरच्या राज्यात किंवा वेळप्रसंगी परदेशातही काढली जाते. तीन दिवस व चाळीस दिवसाच्या जमाअतचे नियोजन तालुका व जिल्हा स्तरावरुनच केले जाते तर इतर कालावधीसाठीचे नियोजन राज्य व राष्ट्रीय स्तरावरुन करण्यात येते.

Web Title: From Solapur, 3 persons participated in the Tabligi Jamaat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.