The society should provide the rites to the youth | समाजाने युवकांना संस्कार दिले पाहिजे

समाजाने युवकांना संस्कार दिले पाहिजे

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शिक्षण, राजकारण, मिडीया, संत आदींनी ठरवले तर देश सहज बदलू शकतो. हल्लीच्या तरुणांना सोशल मिडियाचे वेड लागल्याने तरुण पिढी भरकटत चालली आहे. समाजाने युवकांना संस्कार दिले पाहिजे. संस्कारशील युवकच राष्ट्र घडवू शकतो, असे प्रतिपादन राष्ट्रसंत पद्मभूषण श्रीमद् विजयरत्न सुंदरसुरीश्वरजी म.सा. यांनी सोमवारी येथे केले.
खेतिया (मध्य प्रदेश) येथे सत्संगानिमित्त आलेल्या पद्मभूषण विजयरत्न सुंदरसुरीश्वरजी महाराज येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, समाज, युवापिढीकडून राष्ट्राला काय मिळेल ही अपेक्षा करण्यापेक्षा आपण तरुणांना काय देतो हे महत्त्वाचे आहे. हल्लीच्या तरुणांना जसे ज्ञान दिले त्याचा परिपाक भविष्यात पाहायला मिळेल. यासाठी प्रथमत: वेबसिरीज यासारखे साईड बंद झाले पाहिजे. सध्याच्या तरुणांचा त्याच्यावरच भर आहे. यासंबंधी राज्यसभेत पिटीशन दाखल केले होते. सर्व स्तरातील नेत्यांची भेट घेऊन योग्य निकाल देण्याचीही मागणी केली होती.
शिक्षणाबाबत बोलताना महाराज म्हणाले की, शिक्षणाने पिढी तयार होते. भविष्याची वाटचाल मिळते. कॅरेक्टर नाही. हल्ली गावातील अशिक्षित माणूस एवढ्या चुका करत नाही त्याउपरही सुशिक्षित माणूस चुका करून बसत आहे. त्यामुळे सुशिक्षितपणाचा आव आणण्यापेक्षा मनापासून परिवर्तन करा. सर्वांशी प्रेमाने वागा सदाचार घडवा. सीबीएससी बोर्डाच्या अभ्यासक्रमामध्ये सहावीच्या पुस्तकात थोडाफार अश्लील विषय होता तो निघावा यासाठी पिटीशन दाखल केले आणि तो विषयही काढला. त्यामुळे विद्यार्थ्यांवर लहान वयात योग्य संस्कार पडणे गरजेचे आहे. विविध वेबसाईट यांना भेट देऊन विद्यार्थी नको ती माहिती घेतात, आवश्यक तेवढीच माहिती घेतली पाहिजे. सेक्स एज्युकेशन हा शिक्षणाचा विषय नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्याच्या परिस्थितीत मीडियाबाबत बोलताना ते म्हणाले की, टीआरपी वाढवण्यासाठी सगळीकडे स्पर्धा सुरू आहे. चांगली बातमी देण्यात कोणीही आग्रही नाही ही आजची परिस्थिती व दहा वर्षापूर्वीची परिस्थिती यातही विसंगतपणा आढळतो. संस्कारितपणा हळूहळू लोप पावत चालला आहे. विविध जाहिरातींच्या माध्यमातून संस्कारावरही परिणाम होत आहे. त्यामुळे मीडियानेही अधिकाधिक चांगले देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हैदराबाद घटनेबाबत बोलताना महाराज म्हणाले की, घटना घडली याचा विचार केला पाहिजे. अश्शील चित्रपट बंद केले पाहिजे. नाहीतर देशात अशा घटना घडत राहतील, असे त्यांनी सांगितले.

श्रीमद् विजयरत्न सुंदरसुरीश्वरजी महाराजांचे आजपर्यंत ‘दो कदम विस्मरण से स्मरण की और’ हे पुस्तक दहा भाषेत प्रसिद्ध आहे. हे पुस्तक वाचून ४०० मुलांनी आपल्या वृद्ध आई-वडिलांना वृद्धाश्रमातून परत आणले. जोपर्यंत स्वत:मध्ये बदल होत नाही तोपर्यंत देश बदलणे शक्य नाही. कोणतीही चांगली गोष्ट करण्यासाठी कष्ट सोसावे लागतात. समाजात चांगले संस्कार देण्याचे कार्य आम्ही करत असतो. समाजाने अधिकाधिक चांगले बनण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही केले.

Web Title: The society should provide the rites to the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.