...तर जिल्ह्यात लसीकरणासाला लागतील २० वर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:33 IST2021-02-11T04:33:08+5:302021-02-11T04:33:08+5:30

नंदुरबार : जिल्ह्यात आतापर्यंत नियोजनानुसार उद्दिष्टाच्या केवळ ५८ टक्केच लसीकरण झाले आहे. अर्थात दिवसाला केवळ १९९ जणांना लस दिली ...

... so it will take 20 years for vaccination in the district | ...तर जिल्ह्यात लसीकरणासाला लागतील २० वर्ष

...तर जिल्ह्यात लसीकरणासाला लागतील २० वर्ष

नंदुरबार : जिल्ह्यात आतापर्यंत नियोजनानुसार उद्दिष्टाच्या केवळ ५८ टक्केच लसीकरण झाले आहे. अर्थात दिवसाला केवळ १९९ जणांना लस दिली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १७ लाख लोकसंख्येचा विचार करता सर्वच नागरिकांना लसीकरण करण्यासाठी तब्बल २० वर्षापेक्षा अधिक कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे लसीकरण केंद्र वाढविणे आणि पुरेसे डोस उपलब्ध करण्यासह खासगी रुग्णालयांमध्येही ही सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे.

नंदुरबार जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. ३५ दिवसांत जेमतेम ६९७० जणांना लसीकरण केले गेेले आहे. जिल्ह्याचे उद्दिष्ट हे १२ हजार ७०१ असताना हे प्रमाण अगदीच अत्यल्प आहे. जिल्ह्यात एकूण चार ठिकाणी लसीकरण केंद्रे आहेत. त्यात जिल्हा रुग्णालय, नवापूर उपजिल्हा रुग्णालय, अक्कलकुवा व म्हसावद ग्रामीण रुग्णालयाचा समावेश आहे. सुरुवातीला लसीकरणाचा वेग बऱ्यापैकी होता नंतर मात्र तो कमी झाला. ३५ दिवसांत झालेल्या लसीकरणाचा आकडा पाहता दर दिवशी केवळ १९९ जणांनाच लसीकरण करण्यात आले हे स्पष्ट होते.

हाच वेग कायम राहिला तर जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला अर्थात १७ लाख लोकसंख्येला लसीकरण करण्यासाठी तब्बल २० वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागण्याची शक्यता आहे.

सुरुवातीला लस घेण्याबाबत अनेकांच्या मनात शंका आहेत. ज्या फ्रंटलाईन वर्कर अर्थात आरोग्य कर्मचारी यांची नोंदणी करण्यात आली. त्यांची संख्या एक हजार ९७९ इतकी होती. त्यासाठी १२ हजार ७०१ जणांचे उद्दिष्ट पहिल्या टप्प्यासाठी ठेवण्यात आले होते. त्यासाठी १२ हजार १४० डोस पाठविण्यात आले आहेत; परंतु ३५ दिवसांत देखील संपूर्ण नोंदणी केलेल्यांना लस दिली गेली नाही. दररोज किमान ७०० जणांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते परंतु ते निम्मेच साध्य होत आहे. अद्यापही ५,७३१ जणांना लस देणे बाकी आहे.

सध्या केवळ आरोग्य कर्मचारी यांनाच लस दिली जात आहे. नवीन लस, लसीकरणाचे नियम आणि भीती यामुळे प्रमाण कमी आहे शिवाय प्रत्येक केंद्रावर दिवसाला केवळ १०० जणांनाच लसीकरण करण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे प्रमाण कमी दिसत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

कोट...

शासनाच्या गाईड लाईननुसार लसीकरण सुरू आहे. सुरुवातीला चार सेंटर होती. आता वाढवून ते सात करण्यात आली आहेत. त्यामुळे वेग वाढला आहे. नवीन लस असल्यामुळे काहींना भीती वाटते, परंतु भीतीसारखी काहीही बाब नाही. जर पोलिओ लसीकरण, विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या विविध लसीकरणाची मोहीम एकाच दिवसात यशस्वी केली जाते. त्यामुळे भविष्यात कोरोना लसीकरणाचाही वेग वाढू शकतो.

- डॅा. के. डी. सातपुते,

अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक.

शासनाच्या गाईड लाईननुसार लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी लसीकरण केंद्रांची संख्या वाढवावी. खासगी डॅाक्टरांनाही त्यात सहभागी करून घ्यावे. सध्या केंद्र सरकारचे नियम किचकट आहेत शिवाय नवीन लस असल्यामुळे काहीजण भीतीदेखील बाळगत आहेत तसे होऊ नये व लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी नियम बदलावे लागतील. तेवढ्या प्रमाणात डोस उपलब्ध करून घ्यावे लागतील.

-डॉ. राजेश वळवी,

माजी अध्यक्ष, आयएमए.

Web Title: ... so it will take 20 years for vaccination in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.