साधूचा वेशात दुचाकी चोरट्याच्या आवळल्या मुसक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 12:07 IST2020-02-02T12:05:47+5:302020-02-02T12:07:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : साधूचा वेश परिधान करून सातपुड्याच्या दुर्गम भागातील दुचाकी चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यास एलसीबीच्या पथकाने ...

साधूचा वेशात दुचाकी चोरट्याच्या आवळल्या मुसक्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : साधूचा वेश परिधान करून सातपुड्याच्या दुर्गम भागातील दुचाकी चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यास एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून तब्बल २८ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. दुर्गम भागात राहून जिल्हाभरातून त्यांनी दुचाकी चोरल्याचे स्पष्ट झाले आहे.
भिका मौल्या पाडवी (२५) रा.गोरंबा, हल्ली मुक्काम खडका, ता.धडगाव असे अटक करण्यात आलेल्या संशयीताचे नाव आहे. जिल्ह्यात गेल्या काही महिन्यात दुचाकी चोरीच्या घटना वारंवार घडत असल्यामुळे नागरिक हैराण झाले होते. पोलिसांपुढेही चोरट्याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान उभे होते. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित व अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली चोरट्याचा माग काढण्यासाठी एलसीबीला सांगितले. एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले यांनी चोरीच्या घटनांचा अभ्यास करून चोरट्याचा माग काढण्याचे ठरविले. त्यानुसार, चोरीचे कनेक्शन गोरंबा आणि खडका गावी असल्याचा सुगावा त्यांना मिळाला. त्यानुसार धडगाव तालुक्यातील गोरंबा येथे पथकातील काहीजण गेले. तेथे संशयीत भिका पाडवी सासरवाडी खडका येथे राहत असल्याचे समजले. त्यानुसार खडका येथे देखील पथक पायीच रवाना झाले. तेथे गेल्यावर भिका हा जंगलात राहत असल्याचे समजले. पथकातील दोघांनी साधुचा वेश करीत जंगलातील उंच टेकडीवरील भिका याला गाठले. तेथे त्याच्याशी बोलून त्याची ओळख पटविली. नंतर दोन्ही कर्मचारी गावात आल्यावर त्यांनी पथकातील इतरांना सांगितले. त्यानुसार पथकातील कर्मचाऱ्यांनी भिका राहत असलेल्या टेकडीवरील घराला घेरले. साधुच्या वेशातील दोघांनी थेट झोपडीत जावून त्याच्या मुसक्या आवळल्या. पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अयशस्वी ठरला. त्याला बोलते केल्यानंतर त्याच्याकडे चोरीच्या दुचाकींचे घबाडच सापडले.
कुठलीही माहिती नसतांना पथकाने ही कामगिरी केली. एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले, हवालदार दिपक गोरे, योगेश सोनवणे, विकास अजगे, किरण पावरा, विजय ढिवरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, दुचाकी मालकांनी दुचाकी लावतांना केवळ हॅण्डल लॉकच्या भरवशावर राहू नये. रात्रीच्या वेळी साखळदंडाने दुचाकी बांधून ठेवावी. कॉलनी व परिसरात संशसायस्पदरितीने फिरणारा कुणी आढळल्यास पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन पोलीस अधीक्षक पंडित यांनी केले आहे.
चोरट्याने घराजवळ असलेल्या चाऱ्याच्या गंजीमध्ये १८ दुचाकी त्याने काढून दिल्या. याशिवाय खडका, गोरंबा व आजूबाजूच्या गावात विकलेल्या दहा अशा एकुण २८ दुचाकी त्याने काढून दिल्या. शहादा, तळोदा, नंदुरबार, सारंगखेडा, नवापूर तालुक्यासह गुजरात राज्यातून देखील त्याने दुचाकी चोरल्या असल्याचे निष्पन्न झाले. संबधितांनी शहादा पोलीस ठाणे किंवा एलसीबीशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.