For smooth power supply, farmers block the road at Suli | सुरळीत वीजपुरवठ्यासाठी शेतकऱ्यांचा सुळी येथे रस्ता रोको

सुरळीत वीजपुरवठ्यासाठी शेतकऱ्यांचा सुळी येथे रस्ता रोको


लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : तालुक्यात कृषी पंपाचा वीजपुरवठा पूर्ण दाबाने व सुरळीत अखंडितपणे करण्यासाठी विद्युत वितरण कंपनीकडून कारवाई होत नसल्याने तालुक्यातील सुळी येथे शेतकऱ्यांनी रस्ता रोको केले. येत्या चार दिवसात विद्युत खांब उभे करून समस्येचे समाधान करू, असे आश्वासन मिळाल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.
विद्युत वितरण कंपनीचे उपअभियंता सुधीर माळी व तहसीलदार नवापूर यांना करंजी बुद्रुक, सोनखडका, कुंकरान, मोहनपाडा, पिंपरान, भोमदीपाडा, बोरपाडा, पाटीबेडकी, कामोद, खोकसा, कोटखाम, चिचलीपाडा आदी गावातील शेतक-यांनी वेळोवेळी निवेदन देऊन व तोंडी पाठपुरावा करून कृषीपंपाना होत असलेला कमी दाबाच्या व अनियमित विद्युत पुरवठ्याबाबत तक्रारी करून या समस्या सोडविण्याची मागणी केली होती. विद्युत वितरण कंपनी जाणून-बुजून शेतकऱ्यांना त्रास देत असल्याचा आरोप झाला होता. रोपण भात, कापूस व ऊसाला त्याची झळ बसून नुकसान होत असल्याचे लक्षात आणून देण्यात आले होते. वडखुट येथील फिडर ५० वर्ष जुना व सर्वाधिक विद्युत जोडण्या असलेला फीडर आहे. वारंवार वडखुट फिडर ब्रेकडाऊन होत असल्याने शेतकऱ्यांना कायमसाठी विजेचा प्रश्न निर्माण झाला होता. पाटीबेडकी येथे ३३ के.व्ही. केंद्र मंजूर असूनही त्याचे कार्य सुरु होत नसल्याने समस्यांमधे वाढच होत आहे. शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी सुळी येथील चार रस्त्यावर शेतकऱ्यांनी सकाळी ११ वाजता रास्ता रोको आंदोलन केले.
यावेळी पं.स. सदस्य राजेश गावीत, सरपंच जालमसिंग गावीत, करंजी बुद्रुकचे माजी सरपंच आलू गावीत, नारायण गावीत, जैकु गावीत, नवग्या गावीत, सुभाष वळवी, पंतु गावीत, गंगाराम गावीत यांच्यासह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. जोपर्यंत वडखुट फिडर क्षेत्रतील शेतकऱ्यांना पुरेसा वीजपुरवठा होत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरुन उठणार नाहीत अशी भूमिका घेत वीज अभियंता गोरकर यांना शेतकऱ्यांनी धारेवर धरले. घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक धिरज महाजन पोहोचल्यानंतर त्यांनी शेतकरी व विज अधिकारी यांच्यात चर्चा घडवून आणली. विज अभियंता यांनी चार दिवसात विद्युत खांब टाकून काम पूर्ण करु, असे आश्वसन दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.
यावेळी पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक धिरज महाजन, हे.कॉ.गुमान पाडवी, प्रविण मोरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Web Title: For smooth power supply, farmers block the road at Suli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.