तिधारे पुलाचा स्लॅब काम पूर्ण होण्याआधीच वाकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:29 IST2021-03-26T04:29:53+5:302021-03-26T04:29:53+5:30

याबाबत अपूर्ण कामाबद्दल वृत्तपत्रातून सविस्तर वृत्त प्रकाशित केल्यानंतर प्रशासनाने त्याची दखल घेऊन काही प्रमाणात हालचाल केली. या वेळी आमदार ...

The slab of the Tidhare bridge bent before the work was completed | तिधारे पुलाचा स्लॅब काम पूर्ण होण्याआधीच वाकला

तिधारे पुलाचा स्लॅब काम पूर्ण होण्याआधीच वाकला

याबाबत अपूर्ण कामाबद्दल वृत्तपत्रातून सविस्तर वृत्त प्रकाशित केल्यानंतर प्रशासनाने त्याची दखल घेऊन काही प्रमाणात हालचाल केली. या वेळी आमदार राजेश पाडवी यांनीही समक्ष भेट देऊन सर्व कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर वर्षभरात रस्त्याचे काम पूर्ण झाले व पुलाच्या उर्वरित कामालाही सुरुवात झाली.

पुलाचे निकृष्ट बांधकाम

तिधारे गावाजवळील लाखो रुपये खर्चाच्या पुलाचे बांधकाम अनेक वर्ष अपूर्ण असताना याबाबत आवाज उठविल्यावर या कामास दिवाळीपूर्वी सुरुवात झाली. वास्तविक अपूर्ण कामाबाबत आमदार राजेश पाडवी यांनी समक्ष भेट देत कामाची चौकशी करून संबंधित अभियंता व ठेकेदार यांच्यावर निश्चित कारवाई होईल व कामाचा योग्य दर्जा ठेवून काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. मात्र आता या पुलाच्या कामाची स्थिती बघितल्यास काम अजूनही अपूर्णच असून, काम अत्यंत निकृष्ट व हलक्या दर्जाचे झाले आहे. भविष्यात पुलावरून वाहतूक सुरू झाल्यास तो लवकरच कमकुवत होऊन केव्हा कोसळेल याचा नेम नाही, अशी भीतीदेखील ग्रामस्थांनी बोलून दाखविली.

पुलाचा स्लॅब टाकताना लोखंचे प्रमाण व सिमेंटचे प्रमाण कमी वापरण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. या पुलाचा स्लॅबदेखील आताच वाकून गेला आहे. यावरून काम कसे झाले असेल हे कुणा तज्ञाला सांगण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया काही जागरूक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

लोकप्रतिनिधी गप्प का?; प्रशासनही सुस्त

रस्त्यासह पुलाचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असताना व तेही धिम्या गतीने काम होत असल्याने या भागातील कामांबाबत संबंधित विभाग व लोकप्रतिनिधींचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने ठेकेदार मनमानी पद्धतीने काम करीत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तिधारे भागातील कामाबाबत आमदारांनी अभियंता व ठेकेदारांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले असताना संबंधितांवर काय करवाई झाली असा प्रश्न उपस्थित होत असून, आताही काम निकृष्ट होत असताना तक्रारी होऊनही लोकप्रतिनिधी गप्प का? याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

रस्ता व पुलाच्या कामाची गुण व नियंत्रण समितीकडून चौकशी व्हावी

तिधारे भागातील रस्ता, पुलाच्या कामाची गुण व नियंत्रण विभाग यांच्यामार्फत सखोल चौकशी होऊन काम तातडीने योग्य दर्जाने पूर्ण करण्यात यावे, अन्यथा जिल्हाधिकारी व तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Web Title: The slab of the Tidhare bridge bent before the work was completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.