बर्ड फ्ल्यूसाठी सहा पथके कार्यरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2021 13:00 IST2021-01-31T13:00:52+5:302021-01-31T13:00:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूची लागण नसली तरी जिल्हा प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. यासाठी ...

बर्ड फ्ल्यूसाठी सहा पथके कार्यरत
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूची लागण नसली तरी जिल्हा प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. यासाठी सहा पथके तालुका स्तरावर कार्यरत आहेत. जिल्ह्यात दोन ठिकाणी कावळ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. परंतु, त्यांचा मृत्यू हा विविध कारणांनी झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. बर्ड फ्ल्यूची कुठलीही लक्षणे नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर गेल्या पंधरवड्यापासून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या दरम्यान प्रकाशा व रायसिंगपूर (ता. अक्कलकुवा) याठिकाणी कावळे मरून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. पशुचिकित्सा विभागाने मृत कावळ्यांचे शवविच्छेदन केले असता, त्यांचा मृत्यू जखमा झाल्याने व इतर कारणाने झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. मात्र, असे असले तरी जिल्हा गुजरात व मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवर असल्याने स्थलांतरित पक्षी, कोंबडी यांच्यावर विशेष नजर ठेवली जात आहे.
२००६मधील बर्ड फ्ल्यूने नवापूर येथील पोल्ट्री उद्योगाचे कंबरडेच मोडले होते. उद्योजकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. लाखो कोंबड्या मारून पुराव्या लागल्या. लाखो अंडी नष्ट करावी लागली. त्यानंतर हा उद्योग अद्यापही पुरेशा प्रमाणात उभा राहू शकलेला नाही. पोल्ट्री हब म्हणून राज्यात नवापूरचे नाव अग्रभागी होते. ३०पेक्षा अधिक पोल्ट्री येथे होत्या. एका पोल्ट्रीमध्ये किमान एक लाख व जास्तीत जास्त दोन लाख पक्षी अर्थात कोंबड्या होत्या. अर्थात जवळपास ५० ते ६० लाख कोंबड्या, त्यापासून मिळणारी अंडी हे पाहता कोट्यवधींचा टर्नओव्हर त्यातून होत होता. सद्यस्थितीत केवळ १३ पोल्ट्री याठिकाणी आहेत. जवळपास १८ ते २० लाख कोंबड्या त्यामध्ये आहेत. जिल्ह्याचा विचार करता, जवळपास ७० पोल्ट्री उद्योग आहेत. त्यातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असते.
बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. राज्य शासनाच्या कृती आराखड्यांतर्गत तालकुा स्तरावर सहा पथके व जिल्हा स्तरावर एक अशी सात पथके तयार केली आहेत. प्रत्येक पथकात पशुधन अधिकारीपासून इतर कर्मचारी आहेत. त्यांना शासनाच्या कृती आराखड्याचे दोनवेळा प्रशिक्षण दिले गेले आहे.