सहा महिन्यानंतर एसटीची कॅश गेली पाच लाखाच्या पुढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2020 12:21 IST2020-11-17T12:21:00+5:302020-11-17T12:21:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनामुळे मंदावलेले एसटी महामंडळाचे आर्थिक चक्र दिवाळीत गतीमान झाले आहे. दिवाळीत प्रवाशांनी खाजगी बसेसला ...

सहा महिन्यानंतर एसटीची कॅश गेली पाच लाखाच्या पुढे
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनामुळे मंदावलेले एसटी महामंडळाचे आर्थिक चक्र दिवाळीत गतीमान झाले आहे. दिवाळीत प्रवाशांनी खाजगी बसेसला सपशेल नकार देत एसटीचे बुकींग करुन प्रवासाला सुरूवात केली आहे. यातून सहा महिन्यानंतर प्रथमच नंदुरबार आगाराच्या गल्ल्यात पाच लाखांपेक्षा अधिक रक्कम जमा झाली आहे.
नंदुरबार आगारातून पुणे, मुंबई, पंढरपूर, औरंगाबाद, धुळे, नाशिक, जळगाव जिल्ह्यासह सुरत, अहमदाबाद व वापी कडे जाणा-या सर्वच बसेच हाऊसफुल्ल असल्याचे चित्र गुरुवारपासून दिसून येत होते. शुक्रवारी या हाऊसफुल्ल मध्ये रिझर्व्हेशन चार्टही फुल्ल होवू लागला होता. परिणामी रविवार येईपर्यंत एसटीत जागा मिळेनाशी झाली आहे. प्रवासी पुण्या-मुंबईसारख्या लांब पल्ल्याचा प्रवासही एसटी सोबत करणे पसंत करत असल्याने सहा महिन्यानंतर नंदुरबार आगाराची दिवाळी सुरू झाली आहे. विशेष बाब म्हणजे आगारातून सुटणा-या आगारात परतणा-या अशा दोन्ही प्रकारच्या बसेसला गर्दी असल्याचे चित्र दिसून येत आहे. आगारातून बंद असलेल्या ग्रामीण बसेसही सुरू होत असल्याने शहरातून गावाकडे जाणा-या प्रवाशांचे होणारे हाल वाचले आहेत.
मुंबई, पुणे व पंढरपूर गाडीला मोठे बुकींग
नंदुरबार आगारातून पुण्याकडे जाणा-या ९ फे-या, मुंबई ४ तर पंढरपूरच्या दोन फे-या होतात. या सर्व फे-यांमध्ये जागा मिळत नसल्याने प्रवासी आगाऊ बुकींग करत आहेत. यातून आतापर्यंत ५४५ जणांनी बुकींग करुन प्रवास केला असून रविवारी सायंकाळी पुन्हा बुकींग चार्ट फुल्ल होत असल्याचे दिसून आले.
खाजगी ट्रॅव्हल्सला तुरळक प्रतिसाद
नंदुरबारकडे येणा-या ट्रॅव्हल्सला यंदा मात्र तुरळक प्रतिसाद असल्याचे बोलले जात आहे. ट्रॅव्हल्सकडे नियमित बुकींग असले तरीही जाण्यापेक्षा येणा-यांची संख्या अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे.
गुजरात राज्यातून येणा-या बसेसला गर्दी
सुरत येथून महाराष्ट्रासह गुजरात राज्यातील बसेस सुरू झाल्या आहेत. यात सध्या प्रवाशांची तोबा गर्दी झाल्याचे दिसून येत आहे. अहमदाबाद, वापी या मार्गावरून येणा-या बसेसलाही गर्दी असल्याची माहिती देण्यात आली आहे. आठवडाभर तरी प्रवाशांची संख्या कायम राहिल.
परतीच्या प्रवासाची आरक्षण स्थिती
पुणे व मुंबई या ठिकाणी जाणा-या बसेसाठी आतापासून आरक्षण असल्याचे सांगण्यात आले आहे. गावाकडे आलेले परत जाणार असल्याने त्यांनी २३ नोव्हेंबरपर्यंतचे बुकींग करुन ठेवल्याची माहिती आहे. काहीअंशी खाजगी ट्रॅव्हल्स चालकांकडे परतीच्या सीट्स बुक आहेत. प्रत्येक बुकींग घेणा-याकडे साधार ३० टक्के सीट्स बुक आहेत.
लांब पल्ल्याच्या फेऱ्या माेजक्या
नंदुरबार येथून नाशिकसाठी दिवसभरात ३०, मुंबई ४, पंढरपूर ४ तर पुण्यासाठी ९ फे-या बसेस करत आहेत. या बसेस कमी पडत असल्याचे चित्र सध्या आहे. पंढरपूर मार्गावरील शहरांमधून मोठ्या संख्येने मूळ रहिवासी गावाकडे परत येत असल्याने त्या बसेसला अधिक गर्दी आहे.