सहा महिन्यात 683 जणांचा थांबला श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 12:54 IST2021-06-09T12:54:15+5:302021-06-09T12:54:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाची दुसरी लाट जिल्ह्यासाठी जीवघेणी ठरली आहे. ही लाट ओसरली असल्यानंतर आढावा घेतला असता ...

सहा महिन्यात 683 जणांचा थांबला श्वास
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाची दुसरी लाट जिल्ह्यासाठी जीवघेणी ठरली आहे. ही लाट ओसरली असल्यानंतर आढावा घेतला असता गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा मृत्यूंची संख्याही सहापट अधिक आहे. यात ० ते २५ तसेच २६ ते ५९ आणि ६० पेक्षा अधिक वयोगटातील मृतकांचा समावेश आहे. दरम्यान जानेवारी ते जून या सहा महिन्याच्या काळात ६८३ जणांचे मृत्यू झाले आहेत. यातील ९० टक्के मृत्यू हे शासकीय रुग्णालयांमधील आहेत.
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांसाठी बेड व ऑक्सिजनची निर्मिती करण्यात आली असली तरीही संसर्ग बळावल्याने मयतांची संख्या वाढत होती. केवळ जिल्हा रुग्णालयातच नव्हे तर जिल्ह्यातील खाजगी व जिल्ह्याबाहेर जावून उपचार घेत असलेल्यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात सुरत, नाशिक, पुणे यासह शहरांसह खाजगी दवाखान्यात उपचार घेणा-यांचाही समावेश आहे. गेल्या दीड वर्षात ८५२ मृत्यू झाले आहेत. यातील सर्वाधिक मृत्यू हे जिल्हा रुग्णालयातील आहेत.
कोरोनामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ० ते २५ वयोगटातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्याखालोखाल २६ ते ४९ या वयोगटाचा समावेश आहे. या गटात एकूण ४३६ जणांचा मृत्यू झाला आहे तर ६० वर्षांपेक्षा पुढील वयोगटात एकूण ४२१ जणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात एप्रिल २०२० मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. यातून मार्च ते डिसेंबर या काळात ७ हजार ५२३ जणांना कोरोनाची लागण झाली होती. यातील १६९ जणांचा मृत्यू झाला होता. जानेवारी २०२१ मध्ये बाधितांची संख्या नियंत्रणात येवून ८ हजार ८३१ राहिली होती. यातील ८ हजार ३०९ जण कोरोनामुक्त होते. तर १५० जणांवर उपचार सुरु होते. फेब्रुवारी महिन्यात मात्र मृतांची संख्या वाढून २१९ तर ॲक्टीव्ह रुग्णसंख्या ही ३९६ झाली होती. येथून दुस-या लाटेला सुरुवात झाल्याचे आरोग्य विभागाकडून गृहित धरले गेले आहे.
n एप्रिल ते डिसेंबर २०२० या काळात १६९ जणांचा मृत्यू झाला असल्याचे समोर असताना जानेवारी ते जून या काळात ६८३ जणांचा मृत्यू झाला असून यात २५ ते ५९ व ६० पेक्षा अधिक वयाच्या रुग्णांचा समावेश आहे.
आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार जिल्हा रुग्णालयात आजअखेरीस ५९४ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. शासनाने निर्माण केलेल्या कोविड केअर सेंटर्समध्येही मृत्यू झाले आहेत. यात खापर व नवापूर येथे प्रत्येकी एक, धडगाव व एकलव्य नंदुरबार येथे प्रत्येकी तीन, शहादा सीसीसी एक, तळोदा उपजिल्हा रुग्णालयात सहा, शहादा येथील सामाजिक न्याय विभागाच्या आयसीयूमध्ये १०, नवापूर येथील टाऊन हाॅलमधील आयसीयूमध्ये ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण ६५० मृत्यू हे शासकीय इमारतींमध्ये झाले आहेत.
दुसरीकडे नंदुरबार येथून महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून उपचारासाठी गेलेल्या २२ जणांचा मृत्यू झाला आहे. अहमदनगर येथे एक, पुणे येथे दोन धुळे येथे सहा तर नाशिक येथील विविध खाजगी रुग्णालयात १४ जणांचा मृत्यू झाला आहे.
गुजरात राज्यातील सुरतकडे मोठ्यासंख्येने कोरोनाबाधित गेले होते. यातील सात जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे केली गेली आहे. तर चार जणांचा मृत्यू हा सुरतकडे जाताना रस्त्यात झाला आहे.
जीवघेण्या अशा दुस-या लाटेत होमआयसोलेशनला परवानगी देण्यात आली होती. यातून अनेक जण घरी उपचार घेत होते. हे सर्व रुग्ण सुस्थितीत असल्याचा हवाला देत आरोग्य विभागाने त्यांना होम आयसोलेट होण्याचा सल्ला दिला होता. मात्र यातील १७ जणांचा घरीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जानेवारी ते जून दरम्यान हे घडले आहे. ऑक्सिजन सुविधा, बेड आणि योग्य ते उपचार न मिळाल्याने हा प्रकार घडला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान यातील काहींनी आजार लपवला असावा असाही अंदाज आहे.
उपचारांसाठी लाखो रुपयांचा खर्च करत जिल्ह्यातील विविध खाजगी रुग्णालयात दाखल झालेल्या १८४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यात नवापूर व चिंचपाडा या दोन ठिकाणी ७५ जणांचा मृत्यू झाला आहे. नंदुरबार शहरातील खाजगी रुग्णालयांमध्ये ७३ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील दोन रुग्णालयायेही सर्वाधिक बेड क्षमतेची असल्याने त्यांना सर्वाधिक पसंती दिली जात होती. उर्वरित शहादा येथे पाच, अक्कलकुवा येथे एक असा एकूण १८४ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील ६० टक्के मृत्यू हे दीर्घ काळा उपचार घेतल्यानंतर झाल्याचे स्पष्ट केले गेले आहे.