१७ हजारांसाठी मेहुण्याने केला शालकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:31 IST2021-01-20T04:31:53+5:302021-01-20T04:31:53+5:30
तळोदा : मेहुण्याला दुचाकी घेण्यासाठी दिलेले १७ हजार रुपये परत घेण्याच्या वादातून मेहुण्याने १७ वर्षीय शालकाचा दगडाने ठेचून खून ...

१७ हजारांसाठी मेहुण्याने केला शालकाचा खून
तळोदा : मेहुण्याला दुचाकी घेण्यासाठी दिलेले १७ हजार रुपये परत घेण्याच्या वादातून मेहुण्याने १७ वर्षीय शालकाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना करडे, ता.तळोदा शिवारात १८ रोजी सायंकाळी उघडकीस आली. याबाबत तळोदा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीतास अटक करण्यात आली आहे.
आकाश शंकर वसावे (१७) रा.रेवानगर असे मयताचे नाव असून भुरजी हुरजी पावरा (२०) दोन्ही रा.रेवानगर, ता.तळोदा असे संशयीताचे नाव आहे. त्यास अटक करण्यात आली आहे. आकाश वसावे याने भुरजी पावरा यांना दुचाकी घेण्यासाठी १७ हजार रुपये दिले होते. ते परत मागितल्याने दोघांमध्ये वाद झाला. त्यातून आकाश याला करडे शिवारातील नितीन पाटील यांच्या पपईच्या शेतात नेऊन तेथे त्याच्या डोक्यात दगड घालून ठार केले. पाटील यांना त्यांच्या शेतात मृतदेह आढळल्याने पोलिसांना कळविण्यात आले. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, एलसीबीचे निरिक्षक विजयसिंग राजपूत, तळोद्याचे निरिक्षक नंदराज पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून संशयीत भुरजी वसावे यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली. त्यावरून अटक करण्यात आली असून पोलीस कोठडी देण्यात आली आहे.