तळोदा तालुक्यातही साधेपणाने उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 12:52 IST2020-08-21T12:51:13+5:302020-08-21T12:52:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेल्या समुपदेशनाला प्रतिसाद देत तळोदा शहरातील सात गणेश मंडळांनी गणेशोत्सव साजरा ...

तळोदा तालुक्यातही साधेपणाने उत्सव
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेल्या समुपदेशनाला प्रतिसाद देत तळोदा शहरातील सात गणेश मंडळांनी गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यांच्यासोबतच इतरही काही मंडळांकडून साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला जाईल अशी माहिती आहे़ तळोदा पोलीस ठाण्याकडे या मंडळांनी प्राथमिक बोलणी करत माहितीही दिली आहे़
तळोदा शहरासह ग्रामीण भागात दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो़ तालुक्यात गेल्या वर्षी ८४ गणेश मंडळांनी गणपती मूर्ती स्थापनेसाठी पोलिस प्रशासनाकडे अर्ज केले होते. त्यापैकी १२ गावांमध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवली गेली होती. यंदा मात्र कोरोनामुळे मंडळांनी पोलीस ठाण्यात अर्ज दिलेले नसल्याचे समोर आले आहे़ गुरूवार दुपारपर्यंत चारच अर्ज प्राप्त झाल्याची माहिती आहे़ कोरोनामुळे एक गाव एक गणपती उपक्रम राबवण्याबाबतही गावे उत्सुक नसल्याची स्थ्तिी आहे़ संबधित गावातील गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत तळोदा पोलीस ठाण्याकडून संपर्क करत यंदाही एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवली जावी, हा उपक्रम साधेपणाने करुन घरगुती स्वरूपात उत्सव करावा याबाबत चर्चा करण्यात येत आहे़
तळोदा शहर तसेच तालुक्यातील गणेश मंडळांच्या समुपदेशन करून यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा यासाठी पोलिस प्रशासनाने तालुक्यातील गणेश मंडळांच्या चार ते पाच बैठका घेतल्या. शिवाय पोलीस पाटलांच्या बैठकीत देखील पोलिस पाटलांना गावात झालेल्या स्वरुपात गणेशोत्सव साजरा होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या नुकत्याच झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत देखील अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी कोणत्याही मंडळाला गणेश विसर्जनाची मिरवणूक काढायला परवानगी मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.या सर्व बाबी लक्षात घेता यंदाचा गणेशोत्सव गणेश मंडळानी साध्या व घरगुती पद्धतीने साजरा करावा,यासाठी पोलिस प्रशासनाकडून प्रयत्न होतांना दिसून येत आहेत.