एकलव्य संघटनेतर्फे मूकमोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 12:36 IST2020-11-10T12:36:29+5:302020-11-10T12:36:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा ...

एकलव्य संघटनेतर्फे मूकमोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
सारंगखेडा : शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ म्हाडाचे संस्थापक अध्यक्ष तथा एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांनी व विविध आदिवासी बांधव समाज सेवा संघटनांनी सोमवारी सारंगखेडा येथे पीडितेच्या घरापर्यंत शांततेत मूकमोर्चा काढत पोलीस प्रशासनाशी चर्चा करण्यात आली.
प्रेमसंबंधाच्या नकारावरुन एका अल्पवयीन मुलीची २३ ऑक्टोबरला मध्यरात्री निर्घृणपणे हत्या झाल्याची घटना सारंगखेडा येथे घडली होती. याप्रकरणी राज्यभरात तीव्र पडसाद उमटले असून ठिकठिकाणी संघटनांकडून निषेध नोंदविण्यात येत आहेत. या युवतीच्या खूनप्रकरणी आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी व पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी शिवाजी ढवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांनी मूक मोर्चा काढला. हा मूकमोर्चा तापी पुलापासून थेट बाजारपेठ, ग्रामपंचायत चौकमार्गे पीडित कुटुंबाच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेऊन सांत्वन करण्यात येऊन आपल्या कुटुंबियांना योग्य पद्धतीने न्याय मिळेल याबाबत चर्चा करण्यात आली. ते म्हणाले, ही केस अति जलदगती न्यायालयात चालवण्यात यावी, आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. पुन्हा मोर्चे व आंदोलने सुरू राहतील, असा इशारा शिवाजीराव ढवळे यांनी दिला. नंतर सारंगखेडा पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यांशी येऊन तपासकामी चर्चा करण्यात आली आली.
या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत गुमने, पोलीस निरीक्षक नंदावळकर, सारंगखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक राजेश शिरसाठ, पोलीस निरीक्षक भगवान कोळी, पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे, पोलीस उपनिरिक्षक देविदास सोनवणे आदी उपस्थित होते.
सारंगखेड्याला आले पोलीस छावणीचे स्वरूप
सारंगखेडा येथे पंधरा वर्षीय युवतीचा निर्घुण खून झाल्यानंतर त्या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी विविध सामाजिक संघटनांनी सारंगखेडा येथे गेल्या १५ दिवसापासून मोर्चे, आंदोलने, मूकमोर्चे, नेते मंडळींची पीडित कुटुंबीयांना सात्वनपर भेटी करीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पीडित कुटुंबियांच्या घरासह गावात पोलीस प्रशासनाकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला असल्याने सारंगखेडा गावाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. गावात अनुचित प्रकार होणार नाही म्हणून पोलीस प्रशासन सतर्क असून वेळोवेळी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. त्यासाठी आठवडाभरापासून आठ पोलीस अधिकारी, १०० पोलीस कर्मचारी, होमगार्ड आदींचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.