नंदुरबारात घरपट्टीचे राजकारण पेटण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 12:44 PM2020-10-26T12:44:01+5:302020-10-26T12:44:12+5:30

रमाकांत पाटील। लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गेल्या सात महिन्यापासून शांत असलेले नंदुरबार शहरातील राजकीय वादाच्या चर्चा आता पुन्हा ...

Signs of house politics burning in Nandurbar | नंदुरबारात घरपट्टीचे राजकारण पेटण्याची चिन्हे

नंदुरबारात घरपट्टीचे राजकारण पेटण्याची चिन्हे

Next

रमाकांत पाटील।
लोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबार : गेल्या सात महिन्यापासून शांत असलेले नंदुरबार शहरातील राजकीय वादाच्या चर्चा आता पुन्हा सुरू झाल्या असून त्यामुळे हिवाळ्याच्या गारठ्याची प्रतीक्षा असताना तत्पूर्वीच राजकारणही तापू लागले आहे. निमित्त आहे घरपट्टी वादाचे.
नंदुरबारकरांसाठी पालिकेने घरपट्टीची रक्कम सहा महिन्यांसाठी माफ केली असून विरोधी नगरसेवकांनी मागणी केल्यानंतर त्यावर पालिकेने असा ठराव केल्याचे फलक विरोधी गटातील नगरसेवकांनी चौकात लावले होते. हे फलक वादाचे कारण ठरत आहे. मुळातच पालिकेने असा कुठलाही ठराव केला नसल्याचा खुलासा आधी नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी व मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांनी केला होता. त्याचबरोबर फलक काढून घ्या अन्यथा कारवाईचा इशाराही दिला होता. त्यावर विरोधी गटनेते रवींद्र चौधरी यांनी नगराध्यक्षांना असा ठराव झाला नाही ते सिद्ध करण्याचे आव्हान दिले होते. त्याला उत्तर देण्यासाठी नंदुरबार पालिकेचे सर्वेसर्वा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन सभेचे व्हीडीओ चित्रीकरण दाखवले. गेल्या १६ ऑक्टोबरच्या सभेत असा कुठलाही ठराव झाला नाही. विरोधी नगरसेवक शहरातील नागरिकांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप करीत रघुवंशी यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडेच संबंधित नगरसेवकांना अपात्र करण्याबाबतची तक्रार करणार असल्याचे सांगितले. विरोधी नगरसेवकांच्या भूमिकेमुळे नंदुरबार पालिकेची घरपट्टी वसुली थांबल्याचे त्यांनी सांगितले. केवळ ३५ टक्के वसुली झाली असून त्यामुळे विकास कामांनाही खीळ बसला असल्याचे त्यांनी सांगितले.
चंद्रकांत रघुवंशींनी पत्रकार परिषदेत व्हीडीओ फुटेज दाखवून विरोधी नगरसेवकांना खोटे पाडण्याचा प्रयत्न केला. अर्थातच आता त्यावर विरोधी नगरसेवकदेखील आपली भूमिका मांडण्यासाठी काही तरी कारणे अथवा त्यांच्याकडे उपलब्ध असणारे पुरावे सादर करण्याचे प्रयत्न करतील. पुन्हा त्यावर सत्ताधारी गटाचे उत्तर राहीलच. एकूणच हा वाद लवकर थांबेल, असे चित्र नाही. कोरोनाच्या संकटातून सर्वसामान्य नागरिक आताशी कुठे तरी हळूहळू पूर्वपदावर येण्याचा प्रयत्न करीत असताना शहरातील सत्ताधारी आणि विरोधी गटातील हा वाद विकासाला खीळ बसविणारा ठरू नये, अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे. घरपट्टीच्या वादावर दोन्ही गटांनी आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा कायद्याच्या कक्षेत काय करता येईल व नागरिकांना काय फायदा देता येईल यावर विचार करणे आवश्यक आहे.
काँग्रेस पदाधिकाऱ्यांची
नियुक्ती
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकनाथ खडसे यांच्या प्रवेशानंतर काही कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. अजून कुठले कार्यकर्ते जातील याबाबतची चर्चा असतानाच काँग्रेस पक्षानेही संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या वर्षभरापासून अडखडलेली पक्षाच्या संघटनाची गाडी आता रुळावर आणण्यासाठी पालकमंत्री अॅड.के.सी. पाडवी यांनी कंबर कसली आहे. नुकतीच त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेऊन जिल्हा व तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सीमा वळवी यांना जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्त केले असून सर्व तालुक्यांच्या अध्यक्षांचीही नियुक्ती केली आहे. लवकरच जिल्हाध्यक्षांची निवडही होण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. ही नियुक्ती देताना कार्यकर्त्यांमध्ये   पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी चैतन्य भरण्याचे कामही त्यांनी केले आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह यावा यासाठी गेल्या महिनाभरात त्यांनी दोन-तीन महत्त्वाचे उपक्रम     राबवले. त्यामुळे मरगळ आलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आला आहे.

Web Title: Signs of house politics burning in Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.