तोरणमाळ परिसरात शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:28 IST2021-04-12T04:28:10+5:302021-04-12T04:28:10+5:30
तोरणमाळ हे सातपुडा पर्वत रांगेतील थंड हवेचे ठिकाण असल्याने उन्हाळ्याची चाहूल लागताच याठिकाणी पर्यटकांची गर्दी होते. दरवर्षी मार्च-एप्रिल महिन्यात ...

तोरणमाळ परिसरात शुकशुकाट
तोरणमाळ हे सातपुडा पर्वत रांगेतील थंड हवेचे ठिकाण असल्याने उन्हाळ्याची चाहूल लागताच याठिकाणी पर्यटकांची गर्दी होते. दरवर्षी मार्च-एप्रिल महिन्यात याठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांमुळे हॉटेल, लॉजवर गर्दी असते. तसेच बाजारपेठही फुललेली असते. येथे भेट देणाऱ्या पर्यटकांमुळे तोरणमाळ परिसरातील स्थानिक आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध होतो. मात्र, काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे तोरणमाळ परिसरात सर्वत्र शांतता आहे. तसेच प्रशासनाने तोरणमाळ येथे निर्बंध लागू केले आहेत. गावात जनता कर्फ्यू सुरू आहे. त्यानंतर चार दिवसांच्या लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी तोरणमाळ आश्रमशाळेतील सुमारे २८ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या भागात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी बाजारपेठ, गोरक्षनाथ मंदिर, हॉटेल्स, लॉज व नौकाविहार बंद आहे. तसेच या भागात असलेल्या पर्यटन स्थळांवर जाण्यासदेखील बंदी आहे. राणीपूर गावापासूनच पोलिसांनी बॅरिकेटस लावून रस्ते बंद केले आहेत. ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन व वनविभाग या परिसरात लक्ष ठेवून आहे.