लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : आज शहरातील अंडी व चिकन विक्री करणाऱ्या ४५ विक्रेत्यांना पालिकेच्या आरोग्य विभागाने मौखिक सूचना देऊन विक्री करण्यास मनाई केली. पोल्ट्री फार्मच्या कोंबड्यांचा सरासरी प्रमाणापेक्षा मोठया प्रमाणात आजाराने मृत्यू होत असल्याची माहिती तालुक्यात हवेच्या वेगाने पसरल्याने आज नवापूर शहरात शनिवार बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला. पोल्ट्री फार्मच्या कोंबड्यांचा मृत्यू संसर्गजन्य आजाराने होत असल्याने जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारुड यांच्या तोंडी आदेशाने पालिका प्रशासनाने शहरातील ४५ दुकानदारांना चिकन व अंडी विक्रीला मनाई केली. जिल्हाधिकार्यांनी नवापूर शहरातील एक किलोमीटर परिघातील २२ कुक्कुटपालन पालन व्यवसायाला प्रतिबंधनात्मक उपाययोजना म्हणून सील करण्याचे आदेश केले होते त्याअनुषंगाने तहसीलदार मंदार कुलकर्णी व त्यांचे पथकाने पोल्ट्री फार्मला सील केले. सर्व ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तालुक्यातील सर्व पोल्ट्री फार्म मध्ये नऊ लाख पक्षी आहेत. पैकी आज चार हजार तीनशे दोन कोंबड्यां काल (ता.५) साडे तीन हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला. चार दिवसांत अकरा हजार कोंबड्यांचा संसर्गजन्य आजाराने मृत्यू झाला आहे. कोंबड्यांचा मृत्यू होत असल्याने महसूल व पोलिस प्रशासन पथकाच्या समोर पशुसंवर्धन विभागाने जे सी बी च्या साहाय्याने मेलेल्या कोंबड्यांची शास्त्रोसूक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. नवापूर तालुक्यातील २६ पोल्ट्री फार्म मध्ये साधारण नऊ लाख पक्षी आहेत. या सर्व पक्षांची शास्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. पक्षांचे खाद्य मोठया प्रमाणावर कुक्कुटपालन व्यवसायिकांनी साठवून ठेवले असते त्याची पूर्णपणे विल्हेवाट लावावी लागेल. सर्वच पोल्ट्री फार्मवर पोलिस बंदोबस्तआहे. पोल्ट्री फार्मचे अंडी, चिकन, पक्षी , पशुखाद्य आदी साहित्य पोल्ट्री फार्मच्या बाहेर जाणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे.
नवापुर बाजारात शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 11:17 IST