श्रॉफ हायस्कूलचा सायबर स्मार्ट स्कूल म्हणून गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:36 IST2021-09-08T04:36:34+5:302021-09-08T04:36:34+5:30

कोविड काळात ऑनलाईन शिक्षण घेत असताना अनेक गैरप्रकार वाढत आहेत. योग्य ती दक्षता विद्यार्थ्यांकडून घेतली जात नसल्यामुळे संभाव्य धोके ...

Shroff High School hailed as a cyber smart school | श्रॉफ हायस्कूलचा सायबर स्मार्ट स्कूल म्हणून गौरव

श्रॉफ हायस्कूलचा सायबर स्मार्ट स्कूल म्हणून गौरव

कोविड काळात ऑनलाईन शिक्षण घेत असताना अनेक गैरप्रकार वाढत आहेत. योग्य ती दक्षता विद्यार्थ्यांकडून घेतली जात नसल्यामुळे संभाव्य धोके निर्माण होतात. याबाबत विद्यार्थ्यांचे प्रबोधन करता यावे, या हेतूने ‘सायबर स्मार्ट स्कूल’ या उपक्रमांतर्गत प्रश्न मंजूषा कार्यक्रम घेत जागरुकता घडविण्यात आली. ऑनलाईन असताना कशाप्रकारे काळजी घ्यावी, याबाबत सुरुवातीला शिक्षकांची कार्यशाळा घेण्यात आली. त्यानंतर या उपक्रमात सुमारे १ हजार ८०० विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात आले. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना सोशल मीडिया सुरक्षा, सायबर बुलिंग, आर्थिक सुरक्षा, सार्वजनिक इंटरनेट, सायबर ग्रूमिंग, यावर आधारित गोष्टीरूप ॲनिमेशन दाखविण्यात आले. त्यावर आधारित प्रश्नमंजूषेत यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. ऑनलाईन जगात सुरक्षित राहण्यासाठी प्रायव्हसी सेटिंग कशी बदलावी, हे समजविण्यात आले. जीओ टॅग, चेक इन, लोकेशन, डेट ऑफ बर्थ, ई-मेल इत्यादी खासगी माहिती शेअर करू नये, चॅटिंग किंवा गेम खेळताना वेब कॅमचा वापर करू नये, खासगी माहिती अनोळखी व्यक्तीस सांगू नये, शारीरिक स्वरूपाची ऑनलाईन चेष्टा करणे, खोटी ओळख वापरणे, मिम्सद्वारे थट्टा करणे, यांचा सायबर बुलिंगमध्ये समावेश होतो. हे सारे प्रकार थांबवण्याबाबत विद्यार्थ्यांना मुद्देसूद मार्गदर्शन करण्यात आले.

ऑनलाईन सेवा विकत घेण्यापूर्वी व ऑनलाईन पैसे काढताना अथवा पाठवताना वडिलधाऱ्यांना विचारणे, मोबाईलला मजबूत पासवर्ड देणे, मोबाईल नंबर अनोळखी व्यक्तीस सांगू नये, फ्री वायफायद्वारे बऱ्याचदा वैयक्तिक माहिती व पासवर्ड चोरीला जाऊ शकतो व एखादा स्पाय व्हायरस सुद्धा पाठवण्यात येतो. एखादा मोठा माणूस लहान मुलं बनून ऑनलाईन गप्पा मारतो, त्याला आवडणाऱ्या गोष्टींबद्दल बोलतो, यात मुलांचं नुकसान करणे हा उद्देश असतो, यास सायबर ग्रुमिंग असं म्हणतात. वेब क्राईम व फसवणूक प्रकारात मोडणाऱ्या अशा अनेक बाबींची जागरूकता या उपक्रमांतर्गत घडविण्यात आली. कार्यक्रमाचे संयोजन शाळेतील अटल टिंकरिंग लॅब प्रमुख राजेंद्र मराठे यांनी केले. या उपक्रमाला मुख्याध्यापिका सुषमा शाह, उपमुख्याध्यापक राजेश शाह, पर्यवेक्षक, विद्या सिसोदिया, जगदीश पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. उपक्रमासाठी संजय सिसोदिया, सुरेखा दाणेज, अनिल शाह, केशव राजभोज, वैभव पाटील, जगदीश वंजारी, गिरीश चव्हाण, शिवाजी माळी, जितेंद्र बारी, हेमंत लोहार, देविदास पाटील व सर्व वर्ग शिक्षकांनी सहकार्य केले.

Web Title: Shroff High School hailed as a cyber smart school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.