जिल्ह्यात संततधार ‘श्रावणसरी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:36 IST2021-08-18T04:36:54+5:302021-08-18T04:36:54+5:30
नंदुरबार : अडीच महिन्यांनंतर जिल्ह्यात संततधार पावसाला सुरुवात झाली आहे. प्रतीक्षा असलेल्या पावसामुळे पिकांना संजीवनी मिळाली असून, पावसामुळे नदी-नाल्यांना ...

जिल्ह्यात संततधार ‘श्रावणसरी’
नंदुरबार : अडीच महिन्यांनंतर जिल्ह्यात संततधार पावसाला सुरुवात झाली आहे. प्रतीक्षा असलेल्या पावसामुळे पिकांना संजीवनी मिळाली असून, पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, पावसामुळे तळोदा शहरातील दुकानांमध्ये पाणी गेल्याने व्यावसायिकांचे नुकसान झाले. नंदुरबार, शहादा, तसेच इतर ठिकाणीही दुपारी दोन वाजल्यापासून सायंकाळी साडेसातपर्यंत पाऊस सुरू असल्याने रस्ते पाण्याखाली गेले होते.
ऑगस्ट महिन्याच्या मध्यापर्यंत जिल्ह्यात २८३ मिलीमीटर पाऊस कोसळला होता. सोमवारी हवामान खात्याने जिल्ह्यात पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज दिला होता. यातून मंगळवारी दुपारपासून ढगाळ वातावरण होऊन उकाडा जाणवत होता. दुपारी दोन वाजल्यापासून सर्वत्र पावसाला सुरुवात झाली. कुठे संततधार तर कुठे मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने नागरिक सुखावले होते. सायंकाळी साडेसातपर्यंत हा पाऊस तीव्र आणि मध्यम स्वरूपात सुरू होता. नंदुरबार तालुक्यातील कोळदे येथील कृषी विज्ञान केंद्रात संपर्क केला असता, सरासरी ४० मिलीमीटरपर्यंत पाऊस कोसळला असल्याची माहिती देण्यात आली आहे. जिल्ह्यातील इतर भागांतही ५० ते ६० मिलीमीटरपर्यंत पाऊस कोसळला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी निश्चित आकडेवारी समोर येणार आहे. हवामान खात्याकडून येत्या तीन दिवस जिल्ह्यात सर्वदूर पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामुळे शेतकरी सध्या तरी सुखावले आहेत. पावसामुळे जिल्ह्यातील पावणेतीन लाख हेक्टरवरील खरीप पिकांना जीवदान मिळाले असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.
तळोद्यातील व्यावसायिक त्रस्त
तळोदा शहरात दुपारपासून पाऊस सुरू झाल्यानंतर, मेन रोड आणि काॅलेज रोड भागातील घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरले होते. काही ठिकाणी गटारींचे पाणी घरात येत असल्याने नागरिक हतबल झाले होते. शहरातील भन्साली प्लाझा, तसेच हातोडा रोडवरील दुकानांमधून रात्री उशिरापर्यंत पाणी काढण्यासाठी धडपड करत असल्याचे चित्र दिसून आले होते. पालिकेने याकडे आता तरी लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांची आहे.
शहाद्यात दीड महिन्यांनंतर हजेरी
दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर मंगळवारी शहादा शहरात ढगांच्या गडगडाटासह पावसाचे जोरदार आगमन झाले. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात होऊन दीड तास पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शहरातील मैदाने, शाळांचे आवार, बाजारपेठ, तसेच रस्त्यांवर पाणी साचले होते. मंगळवार असल्याने बाजारात आलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांची पावसामुळे धावपळ उडाली होती.
नंदुरबारात रस्ते जलमय
नंदुरबार शहरात दुपारी दोन वाजल्यापासून रिपरिप पावसाला सुरुवात झाली होती. सायंकाळी पाचनंतर पावसाचा जोर वाढून मुसळधार पाऊस सुरू झाला.
सायंकाळी पावसाचा जोर वाढल्याने रस्ते पाण्याखाली गेले होते. मंगळबाजारात पाणी साचले होते.
श्रावणात कोसळणार्या पावसासोबत विजा चमकून ढगांचा गडगडाट सुरू झाल्याने नागरिकांनी सावध पवित्रा घेत सुरक्षित स्थळ गाठले होते.
ग्रामीण भागात पाऊस
नंदुरबार तालुक्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे कोरड क्षेत्रातील कापूस व सोयाबीन पिकाला आधार मिळाला आहे.
शहादा तालुक्याच्या पूर्व पट्ट्यात पावसाचा जोर अधिक होता. कोंढावळ, जयनगर, सारंगखेडा या परिसरात पावसाने हजेरी दिली. मंदाणे, तसेच मध्य प्रदेश हद्दीलगतही पाऊस होता. पावसामुळे शेतशिवारात काम करणार्या मजुरांची पावसामुळे धांदल उडाली होती.
नुकसानीची कोठेही नोंद नाही : संततधार कोसळलेल्या पावसामुळे कोणत्याही प्रकारची वित्त किंवा जीवितहानी झालेली नसल्याची माहिती सर्व ३६ महसुली मंडळांतून देण्यात आली आहे. दुर्गम भागात रात्री उशिरा पावसाने पुन्हा जोर धरल्याची माहिती देण्यात आली आहे.
तळोदा तालुका आणि शहरात दीड महिन्यानंतर मंगळवारी मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे शहरातील मेन रोड, कॉलेज रोडवरील दुकाने, घरांमध्ये प्रचंड पाणी शिरून व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. तब्बल अडीच तास चाललेल्या या मुसळधार पावसाने सखल भागात पाणी साचले होते. कॉलेज रस्त्यावरील पाणी तेथील घरे, दुकाने, मेन रोड, बस स्थानक परिसरातील दुकानांमध्ये प्रचंड पाणी शिरले होते. त्यामुळे व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले.
रात्री उशिरापर्यंत हे दुकानदार आपल्या दुकानातून पाणी बाहेर काढत होते. दर वर्षी मुसळधार पावसामुळे या भागातील व्यावसायिक यांना असा पाण्याचा सामना करावा लागत असतो. त्यामुळे नगरपालिका काहीच कार्यवाही करायला तयार नसल्याने दुकानदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मुसळधार पावसामुळे शहराला लागून असलेल्या नवीन वसाहतीमध्येही पाणी साचले.