सर्जनाचा अनोखा आविष्कार असलेला महिना म्हणजे श्रावण मास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:34 IST2021-08-13T04:34:25+5:302021-08-13T04:34:25+5:30
यंदा वरुणराजाही न बरसल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. मात्र, काही भागात थोड्या फार प्रमाणात झालेल्या पावसामुळे हिरवाईने सारी ...

सर्जनाचा अनोखा आविष्कार असलेला महिना म्हणजे श्रावण मास
यंदा वरुणराजाही न बरसल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. मात्र, काही भागात थोड्या फार प्रमाणात झालेल्या पावसामुळे हिरवाईने सारी सृष्टी बहरली आहे. त्यामुळे श्रावणाच्या आनंदात भर पडणार आहे. यंदा पाच श्रावणी सोमवार आहेत. श्रावणमास म्हटला की, सणावाराचा व्रत-वैकल्यांचा महिना. तमाम हिंदू बांधव या महिन्यात ईश्वराची आराधना करण्यात गुंतलेले असतात. त्यातूनच येणाऱ्या विविध सणावारांचा आनंद लुटला जातो. यंदा १३ ऑगस्टला नागपंचमी असून, २२ ऑगस्टला भावा-बहिणीचे नाते दृढ करणारा रक्षाबंधनाचा सण आहे. त्या पार्श्वभूमीवर आतापासून राख्यांची दुकाने सजू लागली आहेत. येत्या १७ ऑगस्टला मंगळागौर असल्याने खेळाच्या तालमी रंगू लागल्या आहेत. १९ ऑगस्ट रोजी मोहरम असून, मुस्लिम बांधवही त्याच्या तयारीला लागले आहेत. ३० ऑगस्टला श्रीकृष्णाष्टमी तर ३१ ऑगस्टला गोपाळकाला आहे. त्यामुळे तमाम श्रीकृष्ण मंदिरांमध्ये त्यादृष्टीने पूजाविधीच्या दृष्टीने तयारी सुरू आहे. ६ सप्टेंबरला पिठोरी अमावास्या अर्थात पोळा असून, त्याच्याही तयारीला बळीराजा लागला आहे. पोळ्यासाठी लागणारे साहित्य खरेदीची सुरुवात होणार आहे. आषाढ सरींची झड पडून गेलेली असते. त्यामुळे श्रावणात निसर्ग बहरलेला असतो. त्यात श्रावणसरींचा आनंद लुटत निसर्ग पर्यटनालाही बहर आलेला असतो. त्यामुळे अनेकांकडून त्यादृष्टीनेही नियोजन सुरू झाले आहे.
शासनाने अजूनही धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिलेली नाही. त्यामुळे श्रावणमासात मंदिरांमध्ये होणाऱ्या गर्दीला यावेळी चाप बसला आहे. श्रावण मासात विविध मंदिरांमध्ये भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात असते; परंतु कोरोनामुळे सरकारने अद्यापही मंदिरे खुली करण्यास मान्यता दिलेली नाही. त्यामुळे पुजारी वर्गालाच केवळ पूजाविधीसाठी परवरनगी असणार आहे. श्रावणात यंदा मनाई असल्याने शिवभक्तांच्या आनंदावर विरजण पडणार आहे.