नंदुरबार जिल्हावासीयांना विकासाची स्वप्ने दाखवा व वास्तवातही उतरवा..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 12:53 IST2018-04-13T12:53:04+5:302018-04-13T12:53:04+5:30

नंदुरबार जिल्हावासीयांना विकासाची स्वप्ने दाखवा व वास्तवातही उतरवा..
मनोज शेलार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :नंदुरबारला सहा महामार्गानी जोडले जाईल, आंतरराष्ट्रीय दर्जाचे महामार्ग केले जातील, प्रस्तावीत एमआयडीसीमध्ये टेक्स्टाईल पार्क निर्माण होईल, नंदुरबारचे रेल्वे स्थानक मॉडेल होईल यासह इतर अनेक स्वप्न शहरवासीयांना यापूर्वीच दाखविण्यात आले आहेत. परंतु ते सत्यात उतरविण्यासाठी पाहिजे तसा पाठपुरावा होत नसल्याचे चित्र आहे. यापुढे निवडणुका जशा जवळ येतील तसे आणखी स्वप्न दाखविण्याची स्पर्धा रंगणार आहे.
नंदुरबार शहर व जिल्हा विकासाच्या प्रक्रियेतून जात आहे. अनेक योजना व निधीमुळे विकास कामे होत आहेत. विकास कामे करतांना बेरोजगार हातांना देखील कामे मिळतील यादृष्टीने नियोजन होणे आवश्यक आहे. केवळ अवास्तव स्वप्नरंजनात खिळवून ठेवत जनतेला विकासाचे मृगजळ दाखविण्याचा प्रकार सध्या होत असल्याचे चित्र आहे. अर्थात विकास होत नाही असे नाही, परंतु ज्या घोषणा होतात त्यातील अनेक बाबी प्रत्यक्षात कामे सुरू होईर्पयत गाळल्या जात असल्याचेच चित्र आहे.
शेवाळी-नेत्रंग हा महामार्ग आंतरराष्ट्रीय दर्जाचा करण्याची घोषणा नवापुरातील कार्यक्रमात केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. परंतु या महामार्गाचे वर्कआऊट पहाता हा राज्यमार्ग दर्जाचाच राहणार असल्याचे चित्र आहे. शेवाळी ते महाराष्ट्र हद्दर्पयत दुपदरी अर्थात 10 ते 12 मिटरचा हा महामार्ग असेल. तेथून पुढे चौपदरी राहणार आहे. अशीच स्थिती विसरवाडी ते सेंधवा या महामार्गाची आहे. हा महामार्ग देखील चौपदरीऐवजी केवळ दहा मिटरचा राहणार आहे. कोळदा ते खेतिया कामाला सुरूवात झाली असली तरी विसरवाडी ते कोळदा दरम्यानच्या कामाचा अद्याप पत्ता नाही. नंदुरबारातून दोन उड्डाणपुल प्रस्तावीत होते, आता ते देखील रद्द करण्यात आल्याचे बोलले जात आहे. शहराबाहेरून वळण रस्त्याचा प्रस्ताव देखील फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे या महामार्गाचा उपयोग काय? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे. जळगाव जिल्हा हद्द ते गुजरात हद्दर्पयतचा अमळनेर, शिंदखेडा, दोंडाईचा, नंदुरबार, धानोरा या राज्य मार्गाचे काम देखील रेंगाळले आहे. गेल्या दोन वर्षापासून जिल्हा हद्दीतील काम अद्याप पुर्ण झालेले नाही.
महामार्गाच्या कामांसोबतच गेल्या दहा वर्षापासून रेंगाळलेले रेल्वेमार्ग दुहेरीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. परंतु नंदुरबार रेल्वे स्थानकाला देण्यात आलेल्या मॉडेल दर्जाअंतर्गतची कामे ठप्प आहेत. पश्चिम रेल्वेच्या ताप्ती सेक्शनमधील मध्यवर्ती स्थानक म्हणून या स्थानकाचा विकास होणे अपेक्षीत असतांना त्याकडे दुर्लक्षच झाले आहे.
जिल्हा निर्मितीनंतर 20 वर्षानी देखील एमआयडीसी उभी राहू शकली नाही. आता कुठे प्लॉट पाडण्याचे कामे सुरू आहेत. त्याआधीच टेक्स्टाईल पार्कची घोषणा करण्यात आली आहे. आधी एमआयडीसी तर पुर्णपणे उभारा, नंतर घोषणा करा अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.
मोठमोठय़ा घोषणा करतांन बेरोजगार हातांना देखील काम मिळेल यादृष्टीनेही प्रय} होणे आवश्यक आहे. आज नाव घेण्यासारखा एकही मोठा प्रकल्प नंदुरबार व परिसरात नाही. परिणामी हजारो युवक बेरोजगार आहेत, राजकीय पक्षांच्या मांडलीकत्वाखाली आहेत. यामुळे राजकीय चढाओढीत अशा युवकांचा उपयोग करून घेत त्यांना पुढे करून राजकीय पोळी शेकून घेण्याचा प्रय} होत आहे. शहरात गेल्या दोन वर्षात राजकीय वैमनश्यातून ज्याही घटना घडल्या आहेत त्यात अशा बेरोजगार युवकांनाच आरोपी म्हणून पुढे करण्यात आले आहेत, त्यांच्यावरच सर्वाधिक गुन्हे दाखल आहेत, त्यांनाच सर्वाधिक झळ बसली आहे.
त्यामुळे राजकारणी नेतेमंडळींनी शहर व जिल्हावासीयांना मोठमोठी स्वप्ने जरूर दाखवा, परंतु ते सत्यात उतरविण्यासाठी देखील प्रय} करा. अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेची आहे.