चिनी वस्तू वापरावर नागरिकांकडून अल्प प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 21:20 IST2020-08-05T21:20:34+5:302020-08-05T21:20:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : चीनच्या सूडबुद्धीला आव्हान देण्याच्या निमित्ताने बऱ्याच नागरिकांकडून चिनी वस्तूंच्या वापरावर बंदी आणली आहे. त्यानिमित्ताने ...

चिनी वस्तू वापरावर नागरिकांकडून अल्प प्रतिसाद
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राह्मणपुरी : चीनच्या सूडबुद्धीला आव्हान देण्याच्या निमित्ताने बऱ्याच नागरिकांकडून चिनी वस्तूंच्या वापरावर बंदी आणली आहे. त्यानिमित्ताने कानुबाई, दशामाता गणेशोत्सवासाठी बाजारात विक्रीस आलेल्या चिनी वस्तूंच्या मागणीत सुमारे १५ टक्क्यांनी मागणी घटल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.
सण-उत्सव म्हटला की नागरिकांकडून आकर्षक आरास, देखावा तयार करण्यावर भर दिला जातो. त्यासाठी विशेषत: चिनी वस्तूंचा अधिक वापर करण्यात येतो. या वेळी सजावटीसाठी लागणारे कमल फूल, झाड, मेटल बल्ब, लहान-मोठी लायटींग, स्पॉटलाईट, एलईडी स्ट्रीप, लेझर लाईट, नारळ, एलईडी पार लाईट, ड्रॉप लाईट अशा विविध प्रकारच्या वस्तू बाजारात दाखल झाल्या आहेत. काही दिवसांपासून चीनकडून देण्यात येत असलेल्या धमक्यांमुळे देशवासीयांनी चिनी वस्तूंच्या वापरावर बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा चिनी वस्तूंच्या विक्री व वापरावर परिणाम झाला आहे.
राख्यांमध्ये ‘मेड इन इंडिया’चा
बोलबाला
यावर्षी कोरोनामुळे राखी बाजारावर परिणाम झाला आहे. दरवर्षी एक महिन्यापूर्वीच राख्यांची बाजारपेठ सजत होती. पण यावर्षी पाच ते सहा दिवसापूर्वी ग्रामीण भागातील बाजारात राख्यांची दुकाने पहायला मिळाली. चिनी राख्यांच्या किमतीच्या तुलनेत यावर्षी भारतीय राख्या २० टक्के महाग झाल्या. १५ रुपयांपासून २०० रुपयांपर्यंत किंमत होती. प्रत्येक राखीची कलाकुसर आकर्षक असल्याने प्रत्येकाचे मन मोहून घेतले. मुलांसाठी कार्टून कॅरेक्टरच्या अनेक राख्या उपलब्ध होत्या. त्यात डोरेमॅन, छोटा भीम आणि लायटिंगच्या राख्यांचा समावेश होता.
बाजारात जुन्या चिनी राख्यांची विक्री
शहादा शहरातील व्यापारी म्हणाले की, ज्या व्यापाऱ्यांकडे गेल्यावर्षीच्या जुन्या चिनी राख्यांचा साठा आहे , ते त्या राख्यांची विक्री करीत आहेत. यंदा चिनी राख्या कोणत्याही ठोक व्यापाºयांनी मागविल्या नाहीत. बाजारातही भारतीय बनावटीच्या राख्यांना मागणी होती. सध्या २५ टक्केही व्यवसाय झालेला नाही. जनता कर्फ्यू आणि लॉकडाऊनच्या भीतीने व्यापारी संभ्रमात आहेत.
काही नागरिकांकडून
चिनी वस्तू खरेदी
सध्या कोरोना विषाणूने सर्वत्र धुमाकूळ घातला असून ग्रामीण भागातील जनतेला मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसला आहे. यामध्ये सण-उत्सवाला सुरुवात झाली आहे. काही नागरिक आर्थिक बाजू कुमकुवत जरी झाली आहे तरी सण-उत्सव साजरे करण्यावर भर देत आहेत. सजावटीसाठी लागणारे चिनी वस्तू स्वस्त दरात मिळत असल्याने चिनी वस्तू खरेदीकडे गोरगरीब जनतेचा काही प्रमाणात कल लागला आहे.