सवलत असताना दुकाने मात्र बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 12:35 IST2020-05-05T12:34:52+5:302020-05-05T12:35:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : जिल्ह्यात प्रशासनाने खबरदारी घेत तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनमधून काही बाबींना शिथिलता तर काही बाबी बंद ...

सवलत असताना दुकाने मात्र बंदच
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : जिल्ह्यात प्रशासनाने खबरदारी घेत तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनमधून काही बाबींना शिथिलता तर काही बाबी बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार सोमवारी प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणी दुकान उघडे करण्याचे आदेश असले तरी शहरातील मोठ्या संख्येने दुकानदारांनी खबरदारीचा उपाय म्हणून आपली दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णय घेतल्याने शहरातील विविध भागांमधील दुकाने बंद असल्याचे दिसून आले.
शहादा शहरात कोरोनाचे नऊ रुग्ण आढळल्याने जिल्ह्यात सर्वात जास्त रुग्ण शहरात आहेत. शहरात रूग्ण आढळलेल्या भागांमध्ये प्रशासनाने प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित करून ते सील केले आहे. प्रतिबंधित क्षेत्र वगळता शहरातील इतर भागांमध्ये प्रशासनाच्या वतीने नियमावली आखत व्यापाऱ्यांना ठरवून दिलेल्या वेळेत आपली दुकाने सुरू करण्याची मुभा दिली होती. मात्र अनेक भागातील व्यापाºयांनी आपली दुकाने बंद ठेवण्याचे पसंत केले. शहरात कोरोनाचे नऊ रुग्ण असल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरातील नागरिक गरज नसल्याने बाहेर पडणे टाळत आहेत. शहरात रुग्णांची वाढती संख्या बघता यामुळेच व्यापाºयांनी सुरक्षेच्या कारणास्तव दुकाने बंद ठेवल्याची चर्चा सुरू होती.
शहरातील मेनरोड भागात मुख्य मार्केट आहे. मात्र तो परिसर प्रतिबंधित क्षेत्रात असल्याने मेनरोड भाग पूर्णपणे सील करण्यात आला आहे. तसेच दोंडाईचा रोड, पुरुषोत्तम मार्केट, स्टेट बँक चौक, सप्तशृंगी माता मंदिर आदी भागातील दुकानेही बंद असल्याचे दिसून आले. अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता तुरळक प्रमाणात इतर दुकाने सुरू असल्याचे दिसून आले.