'ब्रेक दि चेन' अंतर्गत दुकाने दुपारी 2 पर्यंत सुरू ठेवण्यास मुभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:23 IST2021-06-01T04:23:09+5:302021-06-01T04:23:09+5:30

जिल्ह्यातील आठवडे बाजार बंद राहतील, अत्यावश्यक सेवा आणि पुरवठा आस्थापना हे पुर्ण वेळ सुरू राहतील. यामध्ये वैद्यकीय ...

Shops are allowed to continue till 2 pm under 'Break the Chain' | 'ब्रेक दि चेन' अंतर्गत दुकाने दुपारी 2 पर्यंत सुरू ठेवण्यास मुभा

'ब्रेक दि चेन' अंतर्गत दुकाने दुपारी 2 पर्यंत सुरू ठेवण्यास मुभा

जिल्ह्यातील आठवडे बाजार बंद राहतील, अत्यावश्यक सेवा आणि पुरवठा आस्थापना हे पुर्ण वेळ सुरू राहतील. यामध्ये वैद्यकीय सेवा, औषधे, पाणी, विद्युत, गॅस वितरण, दुध विक्रेता व वृत्तपत्र छपाई व वितरण, कृषी अवजारे व कृषी उत्पादने यांच्याशी संबंधित असलेली दुकाने व आस्थापना खते, बि-बियाणे, इलेक्ट्रीक मोटार/ट्रॅक्टर यांची खरेदी व दुरूस्ती इत्यादींचा समावेश आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी 7 ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहील, जिल्ह्यातील सर्व किराणा मालाची दुकाने, भाजीपाल्याची दुकाने, फळे विक्रेत्यांची दुकाने, बेकरी, मिठाईची दुकाने, सर्व प्रकारच्या खाद्यान्नाची दुकाने (चिकन, मटन, पोल्ट्री, मासे व अंडी यांसह), पाळीव प्राण्यांच्या खाद्याची दुकाने ही जिवनावश्यक सेवा देणारी दुकाने व आस्थापना सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहतील.

भाजीपाला दुकाने ही खुल्या मैदानात एका आड एक या पद्धतीने आणि दोन दुकानांमध्ये 2 मीटरचे अंतर ठेवून लावण्यात यावेत. याबाबत स्थानिक प्रशासन सुनिश्चिती करेल. इतर आस्थापना व दुकाने सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहतील, सर्व आस्थापना व दुकानांनी दुकानाच्या दर्शनी भागात (नोक मास्क नो एन्ट्री) “विना मास्क प्रवेश नाही” असा सुचना फलक लावणे बंधनकारक असेल. सर्व ठिकाणी कोविड-१९ विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यप्रणालीचे उल्लंघन झाल्यास स्थानिक प्राधिकरणामार्फत संबंधित आस्थापना अथवा दुकान मालक, संस्था चालक यांचे विरूद्ध कारवाई करण्यात येवून सदर दुकान/आस्थापना हे टाळेबंदी कालावधीपर्यंत सील करण्यात येतील.

सर्व दुकाने ही त्यांच्या परिसरामध्ये ग्राहकांमध्ये योग्य सामाजिक अंतर राखून वरील वेळेत सुरू राहतील. ज्यादा ग्राहक असतील, त्या ठिकाणी चिन्हांकित करून, ग्राहकांना प्रतिक्षा कक्षात पुरेसे सामाजिक अंतर राखून बसविले जाईल. आस्थापना/दुकानांमध्ये ५ पेक्षा जास्त संख्येने ग्राहक आढळल्यास स्थानिक प्रशासनामार्फत कारवाई करण्यात येवून पुढील टाळेबंदी कालावधीपर्यंत दुकान सील करण्यात येईल. दुकान मालकांने दुकानामध्ये ग्राहकांशी संवाद साधणेसाठी पारदर्शक काचेमधून अथवा इतर सुरक्षा उपाय, ऑनलाईन पेंमेंट इत्यादीचे सुरक्षा उपायांची पुर्वतयारी करावी.

कलम १४४ आणि रात्र संचारबंदी लागू

नंदुरबार जिल्ह्यामध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी२ वाजेपर्यंत ५पेक्षा जास्त लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र फिरण्यास अथवा एकत्र जमा होण्यास प्रतिबंध असेल. उर्वरित कालावधीसाठी सोमवार ते शुक्रवार दुपारी २ ते सकाळी ७ वाजेपर्यंत आणि शुक्रवार दुपारी २ ते सोमवार सकाळी ७ वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही नागरिकांस वैध कारणाशिवाय फिरण्यास दिलेल्या परवानगीशिवाय फिरता येणार नाही.

वैद्यकीय तसेच इतर अत्यावश्यक सेवा यामधून वगळण्यात येत आहेत आणि यासाठी होणाऱ्या हालचाली किंवा संचार प्रतिबंधीत असणार नाहीत. जिल्ह्यात आठवड्याच्या प्रत्येक शनिवार व रविवार पुर्णत: संचारबंदी लागू असून यामध्ये वैद्यकीय सेवा, मेडीकल, पाणी, विद्युत, गॅस वितरण, दुध विक्रेता व वृत्तपत्र छपाई व वितरणास मुभा राहील.

अन्य राज्यातून जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या नागरिकांना घरातील व्यक्तीचा मृत्यू किंवा वैद्यकीय कारण, अत्यावश्यक सेवेत नोकरीला असल्यास कामाच्या ठिकाणी हजर होणे या व्यतिरिक्त जिल्ह्यात प्रवेश करण्यास मनाई असेल.

कार्यालये २५ टक्के क्षमतेने सुरू

आवश्यक असलेली कार्यालये तसेच पुरवठा, रोजगार हमी योजना, मान्सून पुर्व, मान्सून, लसीकरण करणारी कार्यालये व त्यांच्याशी संबंधित इतर कार्यालये/आस्थापना इत्यादी शासकीय/निमशासकीय कार्यालय हे सर्व कर्मचारी उपस्थितीत सुरू राहतील अन्य शासकीय कार्यालये २५ टक्के क्षमतेनूसार सुरू राहतील. सर्व बँका व पोस्ट ऑफिस हे नियमित वेळेत पुर्ण १०० टक्के कर्मचारी उपस्थितीत सुरू राहतील.

कार्यालयांनी १७ मे २१ रोजीच्या आदेशात नमूद सर्व अटी व शर्तीचे पालन करणे बंधनकारक असेल, विद्युत, पाणी, बॅंक व्यवहार आणि इतर आर्थिक सेवेशी संबंधित शासकीय कार्यालये तसेच शासकीय महामंडळे ही पूर्ण क्षमतेने कार्यरत राहतील. सर्व शासकीय कार्यालये अथवा शासकीय महामंडळे यांच्यामार्फत घेणेत येणाऱ्या कार्यालयातील कर्मचारी व्यतिरिक्त इतर कर्मचाऱ्यांची बैठक ऑनलाईन घेण्यात यावी.

मनोरंजन, करमणूक, रेस्टॉरंट बंद

सर्व उद्याने / सार्वजनिक मैदाने, सिनेमा हॉल, नाट्यगृहे आणि प्रेक्षागृहे, मंनोरंजन पार्क, आर्केस्ट्रा, व्हिडीओ गेम्स पार्लरस, वॉटर पार्क, क्लब, जलतरण तलाव, व्यायामशाळा आणि क्रिडा संकुले बंद राहतील. हॉटेल्स, लॉजिंग, उपहारगृहे, रेस्टॉरंट आणि बारदेखील बंद राहतील. सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेमध्ये पार्सल सुविधा, घरपोच सेवा, टेक अवे सुविधा या सुरू राहतील. कोणत्याही नागरिकांस या सेवा घेण्यासाठी कोणत्याही रेस्टॉरंट आणि बार या ठिकाणी जाता येणार नाही.

सर्व आस्थापनामधील कामगार वर्ग यांनी १५ दिवसांसाठी वैध असलेले कोरोनाचे निगेटीव्ह असल्याचे प्रमाणपत्र जवळ बाळगणे आवश्यक राहील. आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्र किंवा लसीकरण केलेले नाही अशा कामगारवर्गाने घरपोच सेवा दिल्यास सदर व्यक्ती विरूद्ध नियमाचा भंग केल्याबद्दल हजार रुपये दंड आणि संबंधित आस्थापनेकडून रक्कम दहा हजार दंड आकारला जाईल.

धार्मिक, प्रार्थना स्थळे, सांस्कृतिक कार्यक्रम बंद

सर्व धर्मिय धार्मिक अथवा प्रार्थना स्थळे बंद राहतील, सर्व धार्मिक आणि प्रार्थना स्थळामध्ये धार्मिक सेवा करणारे सेवेकरी यांना त्यांच्या पारंपारीक आणि धार्मिक सेवा करता येतील. परंतू यावेळी कोणत्याही बाहेरील भक्तांस प्रवेश असणार नाही. कोणत्याही प्रकारचे धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांना परवागनी असणार नाही.

सर्व केशकर्तनालय दुकाने, स्पा, सलून , ब्युटी पार्लर बंद राहतील. सर्व वृत्तपत्रांची छपाई आणि वितरण सुरू राहील, वृत्तपत्रांची घरपोच सेवा ही आठवड्यातील सर्व दिवशी सकाळी ७ ते रात्री ८ यावेळेमध्ये करता येईल. सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद राहतील, सर्व प्रकारचे खाजगी कोचिंग क्लासेस बंद राहतील. जीआरई, जीएमएटी, टीओईएफएल, आयईएलटीएस इत्यादी व इतर सर्व परिक्षांसाठी विद्यार्थी व त्यांचेसह 1 पालक यांना परिक्षेच्या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी मुभा असेल. त्याकरिता संबंधिताजवळ प्रवेशपत्र अथवा अत्यावश्यक पुरावा जवळ बाळगणे बंधनकारक असेल.

लग्न समारंभासाठी २५ व्यक्तींची मर्यादा

लग्न समारंभासाठी जास्तीत जास्त २५ व्यक्तींच्या उपस्थितीत परवानगी असेल. अंत्ययात्रेसाठी जास्तीत जास्त २० लोकांना परवानगी असेल. ई-कॉमर्समार्फत घरपोच सेवा देण्यासाठी परवानगी असेल. ज्या व्यक्ती अशा प्रकारच्या कार्यात सहभागी असेल त्यांनी लसीकरण होत नाही तोपर्यंत आरटीपीसीआर चाचणी निगेटीव्ह असल्याचे प्रमाणपत्र सोबत बाळगावे. आदेशाचा भंग करणाऱ्या आस्थापनांचा परवाना कोविड-१९ प्रादुर्भाव संपुष्टात येईपर्यंत निलंबीत करण्यात येईल.

Web Title: Shops are allowed to continue till 2 pm under 'Break the Chain'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.