शेठ के. डी. हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत साजरा केला रौप्यमहोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:35 IST2021-08-21T04:35:08+5:302021-08-21T04:35:08+5:30
तळोदा : "अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवुनी जाती" या स्मृतीला उजाळा देण्यासाठी ही पाखरे परत एकदा शाळेच्या प्रांगणात ...

शेठ के. डी. हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत साजरा केला रौप्यमहोत्सव
तळोदा : "अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवुनी जाती" या स्मृतीला उजाळा देण्यासाठी ही पाखरे परत एकदा शाळेच्या प्रांगणात उतरली. औचित्य होते माजी विद्यार्थी मेळावा व स्नेहमीलन सोहळ्याचे. तळोदा येथील शेठ के. डी. हायस्कूलच्या इयत्ता दहावीच्या १९९६ च्या बॅचच्या वर्गमित्रांनी २५ वर्षांनंतर एकत्र येऊन रौप्यमहोत्सव साजरा करत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
तळोदा येथील शेठ के. डी. हायस्कूलमध्ये इयत्ता १० वीच्या वर्गमित्रांनी २५ वर्षांनंतर एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा देत स्नेहसंमेलन आयोजित केले होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण बबनराव माळी होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त शिक्षक ए. व्ही. कलाल उपस्थित होते. यावेळी विविध बॅचेसचे सुमारे १०० माजी विद्यार्थी मेळाव्याला उपस्थित होते. सर्व विद्यार्थी आपल्या शालेय जीवनातील जुन्या आठवणींमध्ये रमले. एकमेकांशी त्यांनी संवाद साधून शालेय जीवनातील विविध प्रसंगांना उजाळा दिला. जुन्या आठवणींना उजाळा दिल्याने सर्वच भावूक झाल्याचे दिसून आले. यावेळी या सर्व वर्गमित्रांनी आपला संपूर्ण दिवस एकमेकांसोबत घालवला. तसेच १९९६ च्या वेळी या विद्यार्थ्यांना ज्यांनी अध्यापन केले, त्या शिक्षकांनादेखील यावेळी बोलावून त्यांचा सत्कार विद्यार्थ्यांनी केला. याप्रसंगी शिक्षकदेखील भावूक झाल्याचे पाहावयास मिळाले. बी. के. पाटील, एस. बी. चित्ते, एल. एच. पाटील, डी. जी. चौधरी, के. जी. परदेशी, डी. सी. पटेल, यु. जी. पिंपरे, एच. के. इंगळे, एस. एस. कलाल आदी शिक्षक व शिक्षिका उपस्थित होत्या.
कार्यक्रमानंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. तसेच अनेक विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. विजय सैदाणे यांनी केले, तर आभार किरण मगरे यांनी मानले.
कार्यक्रमासाठी आनंद सोनार, पंकज तांबोळी, ललित मगरे, भूषण सोनार, मुकेश जैन, योगेश माळी, कपिल माळी, लवकुमार पिंपरे आदी मित्रपरिवार यांनी परिश्रम घेतले.
'प्रत्येकजण आपली शाळा कशी आहे, हे डोळ्यांमध्ये साठवून घेत होता. वर्गमित्र भेटल्याचा आनंद सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसत होता. या भेटीच्या आनंदासोबत आठवणींच्या दुनियेत रममाण होताना डोळ्यांतून डोकावणारे अश्रूही अनेकांना थोपविता आले नाहीत. एकमेकांशी हितगूज करताना शालेय जीवनातील आठवणींची पाने परस्परांच्या साथीने उलगडू लागली, तसतसे भूतकाळात शिरताना आणि वर्तमानाची त्याच्याशी सांगड घालताना सर्वांनाच अनोख्या दुनियेची सफर घडली आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यातील सुखानुभूतीचा प्रत्यय रोमांचित करून गेला.