तीन मुलांच्या दादल्यावर भाळली आणि जीव गमावून बसली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:37 IST2021-09-07T04:37:02+5:302021-09-07T04:37:02+5:30
नंदुरबार- तीन मुलांच्या व्यक्तीशी फोनवर बोलण्यातून तरुणीचे त्याच्याशी प्रेम झाले. आकंठ प्रेमात बुडालेल्या तरुणीने त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावला. त्यातून ...

तीन मुलांच्या दादल्यावर भाळली आणि जीव गमावून बसली
नंदुरबार- तीन मुलांच्या व्यक्तीशी फोनवर बोलण्यातून तरुणीचे त्याच्याशी प्रेम झाले. आकंठ प्रेमात बुडालेल्या तरुणीने त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावला. त्यातून सुटका करून घेण्यासाठी तिला बिहारमधून सुरतला बोलाविले. सुरतहून नंदुरबारला आला आणि तिच्या गळ्यावर ब्लेडने वार करून खून करीत सुटका करून घेण्याचा प्रयत्न केल्याची बाब उघड झाली आहे. नंदुरबारनजीक बिलाडी शिवारात आठ दिवसांपूर्वी आढळलेल्या अनोळखी महिलेच्या खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यास नंदुरबार एलसीबीला यश आले आहे. मयत तरुणीचे नाव सीताकुमारी समदकुमार भगत (२४), रा. चमारिया चैनपूर, ता. मशरक, जि. छपरा (बिहार) असे आहे. अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव विनयकुमार रामजनम राय (३८), रा.खमहौरी, पो.राजापूर, ता. महाराजगंज, जि. सिवन (बिहार) असे आहे.
दरम्यान, मृतदेहाजवळ कुठलाही पुरावा नसताना केवळ घटनेचे धागे एकमेकांशी गुंफत संशयितापर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले. तपासी पथकाच्या या कामगिरीमुळे जिल्हा पोलीस प्रमुखांनी रोख रकमेचे बक्षीस देऊन त्यांचा गौरवही केला.
या खुनाच्या गुन्ह्याचा उकल कसा झाला याची माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन दिली. त्यांनी सांगितले की, २९ ऑगस्ट रोजी नंदुरबारनजीक बिलाडी रस्त्यावर रेल्वे रुळाजवळ एका महिलेचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत पडलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तत्काळ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह शहर पोलीस ठाणे व एलसीबीचे पथक घटनास्थळी रवाना झाले. मृतदेह असलेली जागा, त्याची अवस्था व इतर बाबी लक्षात घेऊन लागलीच तपासाच्या सूचना दिल्या. मृतदेहाचे डोके व एक हात धडापासून वेगळे काही अंतरावर पडलेले होते. त्यामुळे हा निर्घृण खून असल्याचे प्रथमदर्शनी दिसताच खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाला दिशा दिली; परंतु मृतदेहाजवळ ओळख पटेल असे काहीच नव्हते. अंगात असलेली लेगीज व टॉप तोही फाटलेल्या अवस्थेत असल्याने त्यावरूनही काही सुगावा नव्हता. त्यामुळे जिल्ह्यासह लगतचे जिल्हे व गुजरात आणि मध्यप्रदेशातील पोलीस ठाण्यांना संपर्क करून बेपत्ता महिलांविषयीची माहिती मागविली; परंतु उपयोग झाला नाही.
२१ रेल्वेस्थानकांमधील फुटेज तपासले
खुनाच्या गुन्ह्याच्या तपासासाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. याचदरम्यान पाचोराबारी, ता.नंदुरबार येथील रेल्वे स्थानकानजीकच्या कल्पेशभाई पटेल यांच्या घराला सीसीटीव्ही कॅमेरे असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणेे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी एका पथकास तेथील फुटेज तपासण्यास सांगितले. पथकाने तपासले असता त्यात २४ ऑगस्ट रोजी रात्री एक तरुणी व एक व्यक्ती नंदुरबारकडे जाताना आढळले. मयत तरुणीच्या अंगावरील कपड्यांशी मिळतेजुळते कपडे त्या तरुणीने घातले होते. त्यामुळे संशय बळावला. पुढे तपासाला दिशा मिळत गेली. ढेकवद रेल्वे ट्रॅकमनने त्याच रात्री सुरत-भुसावळ पॅसेंजरने ते दोघे उतरल्याचे सांगितले. त्यामुळे पाचोराबारी ते सुरत यादरम्यान २१ रेल्वेस्थानकांमधील सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्याची मोहीम कळमकर यांनी पथकांच्या मदतीने सुरू केली. सुरतच्या एका फ्लॅटफाॅर्मवर व रिक्षातून उतरताना तरुणी व संशयित त्याच दिवशी सायंकाळी दिसले. तेथे रिक्षा चालकाचा शोध घेऊन माहिती घेतली असता त्याने एका कापडाच्या दुकानातून त्यांना रेल्वेस्थानकात आणल्याचे सांगितले. कापडाच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्येदेखील ते दिसले. दुकानातून दोन टी-शर्ट खरेदी केल्याचे समजले. त्याच्या बिलावर सुदैवाने मोबाइल नंबर लिहिलेला होता. त्या नंबरवरची पडताळणी केली असता तो विनयकुमार रामजनम राय (३८), रा.खमहौरी, पो. राजापूर, ता. महाराजगंज, जि. सिवन (बिहार) याच्या नावावर असल्याचे समजले. त्या व्यक्तीचा शोध घेतला असता सुरत येथील टेक्स्टाइल मिलमध्ये काम करीत असल्याचे समजले. त्याच्या घराचा पत्ता शोधून त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली आणि शिताफीने त्याला ताब्यात घेतले.