रस्ता कामामुळे उडणाऱ्या धुळीच्या त्रासाने शहादेकर त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 14:23 IST2020-03-04T14:23:04+5:302020-03-04T14:23:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरात प्रवेश करताना छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराजवळच कोळदा ते खेतिया रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू ...

रस्ता कामामुळे उडणाऱ्या धुळीच्या त्रासाने शहादेकर त्रस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरात प्रवेश करताना छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराजवळच कोळदा ते खेतिया रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे. रस्त्यावर तात्पुरती पिवळी माती टाकून लहान वाहनांसाठी रस्ता रहदारीस खुला केला आहे. मात्र धुळीमुळे समोरुन येणारे वाहन दिसत नसल्याने अपघात होत आहेत. अशीच स्थिती डामरखेडा गावाजवळ असल्याने रविवारी झालेल्या अपघातात दोन जणांना प्राण गमवावा लागल्याने संबंधित ठेकेदाराविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
कोळदा ते खेतिया या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम गेल्या तीन वर्षापासून अत्यंत संथगतीने सुरू आहे. परिणामी वाहनधारकांसह रस्त्यालगतच्या गावातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता रुंदीकरण कामाला नागरिकांचा विरोध नसून त्यामुळे विकासच होणार आहे. परंतु संबंधित विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिक अक्षरश: या कामाला कंटाळले आहेत. या रस्त्यादरम्यान असलेल्या गावातील नागरिकांना धुळीमुळे आजारांना सामोरे जावे लागत आहे. ज्याठिकाणी पर्यायी मातीचे रस्ते तयार केले आहेत अशा रस्त्यांवर वारंवार पाणी शिंपडणे गरजेचे असताना ठेकेदाराचे मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
सध्या शहादा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मुख्य प्रवेशद्वाराजवळ रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. याठिकाणीही मातीकाम सुरू असल्याने सकाळ-संध्याकाळ फिरायला जाणाºया नागरिकांसह या परिसरातील व्यावसायिकांना धुळीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
सकाळी साडेसहा वाजेच्या अगोदर व सायंकाळी पाच वाजेपासून धुळीमुळे या रस्त्यावर समोरुन येणारे वाहनच दिसत नाही. वाहनधारकांना दिवे लावून तेवढा रस्ता पार करावा लागतो. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अशीच परिस्थिती तालुक्यातील डामरखेडा गावाजवळ असून रविवारी मोटारसायकलचा अपघात होऊन दोन जणांना प्राण गमवावा लागल्याची घटना घडली. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
रस्त्याचे मातीकाम सुरू असताना ठेकेदाराने नियमानुसार त्या जागेवर दिवसातून तीनवेळा पाणी टाकणे बंधनकारक आहे. परंतु संबंधित ठेकेदाराकडून दोन-तीन दिवस पाणी मारले जात नसल्यामुळे धुळीचे प्रमाण जास्त झाले आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.