शहाद्यातही फौजदाराला धक्काबुकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 11:53 IST2019-02-23T11:52:59+5:302019-02-23T11:53:20+5:30
दोघांना अटक : शुटींग करण्याचाही झाला दोघांकडून प्रयत्न

शहाद्यातही फौजदाराला धक्काबुकी
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दारूच्या नशेत पोलीस ठाण्यात येवून फौजदाराशी हुज्जत घालून कॉलर पकडल्याची घटना शहादा पोलीस ठाण्यात घडली. याप्रकरणी डामरखेडा येथील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.
अक्कलकुवा येथे फौजदाराची कॉलर पकडल्याची घटना घडल्यानंतर शहादा येथे दुसरी घटना घडली. रवी सुभाष ठाकरे व रुपेश दिलीप सामुद्रे रा.डामरखेडा अशी संशयीतांची नावे आहेत. २१ रोजी रात्री दोन्हीजण पोलीस ठाण्यात दारूच्या नशेत गेले. तेथे ड्युटीवर असलेले फौजदार ज्ञानेश्वर बडगुजर यांना त्यांनी पोलीस निरिक्षक शुक्ल यांचा मोबाईल नंबर विचारला तसेच पोलीस ठाण्याची मोबाईलमध्ये शुटींग काढू लागले.
बडगुजर यांनी त्यांना हटकले असता त्याचा राग येवून जोरजोराने आरडाओरड करून त्यांची कॉलर पकडत धक्काबुकी केली. आपण एका संघटनेचे अध्यक्ष आहोत, आपल्याला ओळखत नाही काय? असे सांगून अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. तेथे असलेल्या इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी दोघांना ताब्यात घेतले.
याबाबत फौजदार ज्ञानेश्वर बडगुजर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रवी ठाकरे व रुपेश सामुद्रे यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणने व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना रात्री साडेअकरा वाजता अटक करण्यात आली. तपास पोलीस निरिक्षक संजय शुक्ल करीत आहे. दरम्यान, सलग दुसरी घटना घडल्याने पोलीस वर्तूळात चर्चेचा विषय आहे.