शहादा-शिरपूर मार्ग बनला मृत्यूचा सापळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 12:21 IST2019-09-21T12:21:23+5:302019-09-21T12:21:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बामखेडा : शहादा-शिरपूर मार्गावर पावसामुळे मोठय़ा प्रमाणावर खड्डे पडले असून वाहनांचे छोटे-मोठे अपघात होत असल्याने हा ...

शहादा-शिरपूर मार्ग बनला मृत्यूचा सापळा
लोकमत न्यूज नेटवर्क
बामखेडा : शहादा-शिरपूर मार्गावर पावसामुळे मोठय़ा प्रमाणावर खड्डे पडले असून वाहनांचे छोटे-मोठे अपघात होत असल्याने हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. दोन महिन्यांपूर्वीच लाखो रुपये खर्च करुन या महामार्गाची डागडूजी करण्यात आली. परंतु पहिल्याच पावसात रस्त्याचा बोजवारा उडाला. या रस्त्यावरील वाहनांची वर्दळ लक्षात घेऊन हे खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित बुजविणे गरजेचे आहे.
शहादा-शिरपूर या मार्गावर आधीच असलेल्या खड्डय़ांमुळे वाहनधारक त्रस्त झाले होते. त्यात गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने या मार्गाची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. पावसामुळे मोठमोठे खड्डे तयार झाल्याने हे खड्डे टाळण्याच्या प्रयत्नात जागोजागी लहान-मोठे अपघात वाढले आहेत. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. वडाळी ते बामखेडा या तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्यावरील खड्डे पाहिले तर ‘रस्त्यात खड्डे की खड्डय़ात रस्ता’ या प्रश्नाचे उत्तर देणेदेखील अवघड होते. या रस्त्यावरून वाहनचालकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यात वाहनांचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान होते. तसेच या मार्गावर नियमित ये-जा कराणा:यांना विविध व्याधींना तोंड द्यावे लागत आहे. या मार्गावर लहान-मोठे वाहनांसह अवजड वाहने, कंटेनर यांची वर्दळ मोठय़ा प्रमाणात आहे. मात्र मोठमोठय़ा खड्डय़ांमुळे अवजड वाहने निघण्यास अडचणी येत असल्याने जागोजागी वाहतुकीची कोंडी होऊन इतर वाहनधारकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो.
शहादा ते शिरपूर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वर्षभरात ब:याचवेळा लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र महिना-दोन महिन्यात या मार्गाची अवस्था ‘जैसे थे’ होते. दुरुस्तीचे काम निकृष्ट प्रतीचे होत असल्याने पुन्हा खड्डे पडून वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतो, असा आरोप वाहनधारकांकडून होत आहे. या रस्त्याचे नूतनीकरण अथवा दुरुस्तीचे दज्रेदार काम झाले तर वाहनधारक या समस्येतून मुक्त होतील. गेल्या दोन महिन्यापूर्वीच लाखो रुपये खर्च करून या रस्त्याची डागडूजी करण्यात आली होती. मात्र अपेक्षित पाऊस नसतानाही काही दिवसातच खड्डे ‘जैसे थे’ होत होते. त्यात गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीची भर पडून रस्त्यांवरील खड्डय़ांचे आकार वाढल्याने सद्यस्थितीत तर या रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित खड्डे बुजवून हा रस्ता वाहनधारकांसाठी सुरक्षित करावा, अशी मागणी केली जात आहे. शहादा ते शिरपूर हा मार्ग 50 ते 55 किलोमीटर अंतराचा असून या मार्गावरुन नेहमी शालेय विद्यार्थी प्रवास करतात. खड्डय़ांमुळे या रस्त्यावर नेहमी लहान-मोठे अपघात होत असून मोठय़ा अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. संबंधित विभागाला रस्ता दुरूस्तीबद्दलची जाग येत नाही. अजून किती निष्पाप बळी जाण्याची वाट सार्वजनिक बांधकाम विभाग पाहत आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया त्रस्त वाहनधारकांकडून व्यक्त होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्त्याच्या डागडूजीसाठी केव्हा मुहूर्त सापडेल, असा संतप्त सवालही केला जात आहे.