शहादा शहर स्वयंस्फूर्तपणे तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 13:07 IST2020-04-19T13:07:08+5:302020-04-19T13:07:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : येत्या २१ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत वैद्यकीय सुविधा व औषध दुकाने तसेच दूध विक्री केंद्र वगळता ...

शहादा शहर स्वयंस्फूर्तपणे तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : येत्या २१ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत वैद्यकीय सुविधा व औषध दुकाने तसेच दूध विक्री केंद्र वगळता शहादा शहरातील सर्व आस्थापना स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्याचा निर्णय अधिकारी व व्यापाऱ्यांच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला. नागरिकांनी संचारबंदीचे कठोरपणे पालन करावे व घरातच राहावे. अनावश्यक विनाकारण घराबाहेर पडल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांनी दिला आहे.
नंदुरबार शहरात कोरोना विषाणू संक्रमीत रुग्ण आढळल्याने त्याचे लोन इतरत्र पसरू नये यासाठी शनिवारी नगरपालिका कार्यालयात प्रांताधिकारी डॉ.गिरासे यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांचे अधिकारी, व्यापारी व भाजीपाल्याचे ठोक विक्रेते यांची विशेष बैठक पार पडली. बैठकीला तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे, मुख्याधिकारी राहुल वाघ, पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र पेंढारकर यांच्यासह व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुमतीलाल जैन व व्यापारी उपस्थित होते.
कोरोना विषाणूचा संसर्ग पसरु नये यासाठी गेल्या महिनाभरापासून प्रशासनातर्फे आवश्यक ती खबरदारी बाळगली जात आहे. शहादा तालुका हा मध्य प्रदेश व गुजरात या दोन राज्यांच्या सीमेवर असल्याने विशेष खबरदारी बाळगली जात आहे. अशातच शुक्रवारी नंदुरबार शहरात कोरोना विषाणू संक्रमित रुग्ण सापडल्याने विशेष खबरदारीसाठी शनिवारी बैठक घेण्यात आली. बैठकीत प्रशासनाने व उपस्थित व्यापाऱ्यांनी १९ एप्रिलपासून तीन दिवस अर्थात २१ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत स्वयंस्फूर्तीने सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे एकमताने निर्णय घेण्यात आला. यात रुग्णालय, मेडिकल दुकान व दूध विक्रेत्यांना वगळण्यात आले असून उर्वरित सर्व किराणा दुकान व भाजीपाला विक्री बंद ठेवली जाणार आहे. २२ एप्रिलपासून नियमितपणे सर्व व्यवहार सकाळी आठ ते बारा या कालावधीत सुरळीत करण्यात येणार आहे. नागरिकांनी या बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णयाला पाठिंबा द्यावा व पुढील तीन दिवस घरातच थांबावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी प्रशासनातर्फे आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये. स्वत:ची काळजी घ्यावी. मास्क वापरणे, हात नियमित धुणे, सॅनिटायझरचा वापर आदी उपाययोजनांवर भर द्यावा. खोकला, श्वास घेताना त्रास आणि ताप अशी लक्षणे आढळल्यास त्वरीत रुग्णालयात तपासणी करून घ्यावी. नागरिकांनी घाबरू नये व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही प्रांताधिकारी डॉ.गिरासे यांनी केले..
दरम्यान, नंदुरबार येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली असून शहरातील प्रमुख रस्त्यांवर बॅरिकेटिंग केली आहे. यात वनविभागाच्या कार्यालयाजवळील जुना प्रकाशा रस्ता, मुख्य बाजार चौकातील खेतिया रस्त्यावरील पाण्याच्या टाकीजवळ आदी महत्त्वपूर्ण चौकात बॅरिकेटिंग करण्यात येत असून शहरातील गर्दी कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोना विषाणूचे संक्रमण आपल्या परिसरात होऊ नये यासाठी प्रशासनातर्फे विशेष दक्षता बाळगली जात आहे. शिक्षण व व्यवसायानिमित्त परजिल्ह्यात राहणारे अनेक नागरिक शहाद्याला परतले आहे. अशा नागरिकांनी स्वत:हून प्रशासनाशी संपर्क साधून माहिती द्यावी. त्याचप्रमाणे अशा नागरिकांची शेजाºयांनीही माहिती द्यावी. प्रशासनातर्फे अशा नागरिकांच्या माहितीचे संकलन सुरू आहे. नागरिकांनी शासकीय नियमांचे पालन करून काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी केले आहे.